मुंबई, नागपूर, नवी दिल्ली : विधान परिषद निवडणुकीत अनपेक्षित यशाने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असतानाच, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला आहे. त्यातून थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून आता मिटविण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली असताना, त्यांनी अर्ज न भरता पुत्र सत्यजित तांबे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे तांबे पितापुत्रांनी पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे थोरात दुखावल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून पक्षात आपली अवहेलना होत असल्याची तक्रार केली. विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळय़ा चर्चेला उधाण आले आहे. थोरात यांना राजीनामा स्वीकारला जाण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची आपणास कल्पना नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. थोरात आपल्याशी काहीही बोललेले नाहीत. पुढील आठवडय़ात प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत हा विषय चर्चेला घेतला जाईल, असे पटोले यांनी म्हटले आहे. परंतु प्रदेश काँग्रेसमधील वाद दिल्लीत पोहोचल्यामुळे आता प्रदेश कार्यकारिणी बैठकही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या घडोमाडींवर बाळासाहेब थोरात यांनी अद्याप कोणतेही जाहीर भाष्य केलेले नाही.
कुणाच्या घरातील भांडणाशी पक्षाला देणेघेणे नाही. काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले यश मिळू लागले आहे. भविष्यात आलेख वाढताच राहणार आहे. हे कुणाला रुचत नसेल म्हणून माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असतील. बाळासाहेबांना वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, भाजप
प्रदेश कार्यकारिणीवर प्रश्नचिन्ह
१५ फेब्रुवारीला प्रदेश कार्यकारिणी बैठक होणार असल्याचे पटोले यांनी नागपूरमध्ये सांगितले. पोटनिवडणुकांची रणनीती ठरवायची आहे. नवनिर्वाचित शिक्षक व पदवीधर आमदारांचा सत्कार करायचा आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत चाललेले पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यासाठी ही बैठक होणार असल्याचे पटोले म्हणाले. मात्र पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे दिल्लीमधील पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
वाद मिटविण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा पुढाकार
प्रदेश काँग्रेसमधील बेबनावाची गंभीर दखल दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागली आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मंगळवारी तातडीने दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पक्षांतर्गत वाद मिटवला जाईल, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. पटोले यांच्या विरोधात विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनीही खरगे यांना पत्र पाठवले होते. त्यावर पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नव्हती. आता थोरात यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्याने तक्रार केल्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला दखल घ्यावी लागली आहे. मात्र राहुल गांधी यांचा अद्यापही पटोलेंनाच पाठिंबा आहे.