पीटीआय, चेन्नई
तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक-भाजप युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.अण्णा द्रमुकचे सरचिटणीस के. पलानिस्वामी म्हणाले, की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जयललितांवर केलेल्या टीकेमागे त्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच आहे. त्यात राजकीय अप्रगल्भता आणि बेजबाबदारपणा दिसतो. या संदर्भात आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात ठराव केला आहे.
अण्णा द्रमुकने के. अण्णामलाई यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर अण्णामलाई पुन्हा आक्रमक झाले. तमिळनाडूच्या राजकारणात भ्रष्टाचार ही प्रमुख समस्या आहे, असे त्यांनी म्हटले आहे.अण्णा द्रमुकच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत अण्णामलाई यांच्या निषेधाचा ठराव मंजूर झाल्यानंतर काही वेळातच अण्णामलाई म्हणाले की, मी तमिळनाडूतील लोक आणि भाजप कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, भ्रष्टाचार हा या राज्यात मोठा प्रश्न आहे. गेली अनेक वर्षे लोककल्याणाच्या अनेक योजना राजकीय नेत्यांनी स्वाहा केल्या. भ्रष्टाचारामुळे राज्याची अपकिर्ती झाली आहे.
दरम्यान, अण्णा द्रमुकने अण्णामलाई यांच्या निषेधार्थ केलेल्या ठरावात म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते के. पलानिस्वामी यांच्यामुळेच राज्याच्या विधिमंडळात २० वर्षांनी भाजपचे चार आमदार निवडून येऊ शकले.अण्णामलाई यांनी आपले तोंड आवरले नाही, तर भाजपबरोबरची युती मोडावी, अशी भूमिका सोमवारी माजी मंत्री डी. जयकुमार यांनी मांडली होती.
ईडीची मंत्र्याविरोधात कारवाई
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तमिळनाडूचे विद्युतमंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि अन्य काही जणांच्या आस्थापनांवर मंगळवारी छापे टाकले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात बालाजी यांच्याविरोधात नोकऱ्यांसाठी रोख रक्कम घेण्याच्या प्रकरणी पोलीस आणि ईडी चौकशीला परवानगी दिली होती. गेल्याच महिन्यात आयकर विभागानेही बालाजी यांच्या निकटवर्तीयांच्या आस्थापनांवर छापे टाकले होते.