नवी दिल्ली/पुणे : हिंदी भाषा प्रादेशिक भाषांच्या सक्षमीकरणाचे माध्यम बनेल. हिंदीमुळे प्रादेशिक भाषा अधिक मजबूत होतील.  त्यामुळे सर्व कार्यालयीन कामामध्ये हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे, असे विचार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मांडले.  शहा यांच्या या विचारांमुळे भाषिक वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. सनातन धर्मावर टीका करणारे ‘द्रमुक’चे नेते उदयनिधी यांनी शहांच्या हिंदीच्या कथित प्रभुत्वाच्या मुद्दय़ाला विरोध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदी दिनानिमित्त आयोजित अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाले. त्याप्रसंगी दूरभाष प्रणालीद्वारे अमित शहा यांनी संवाद साधला. तसेच त्यांनी गुरुवारी ‘एक्स’ या समाजमाध्यम व्यासपीठावरून हिंदी भाषा दिनानिमित्त संदेश प्रसारित केला. त्यातही त्यांनी हिंदीचा आग्रह धरला आहे. हिंदीची इतर भारतीय भाषांशी स्पर्धा नाही. उलट, तिच्यामुळे प्रादेशिक भाषांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा करेल, असे शहा म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात हिंदीचे मोठे योगदान राहिले असून विविध भाषा आणि बोलींमध्ये विभागलेल्या या देशात हिंदी भाषेने एकात्मतेची भावना निर्माण केली. स्वातंत्र्यलढय़ाला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे नेण्यात हिंदीने ‘संवाद भाषे’ची भूमिका बजावली. म्हणून संविधानकर्त्यांनी १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले, असेही शहा म्हणाले. प्रत्येक देशी भाषा व बोली ही सांस्कृतिक खजिना आहे. प्रत्येक भाषेला सशक्त करूनच आपण सशक्त राष्ट्र निर्माण करू शकतो, असेही विचार शहांनी मांडले. शहांच्या या विचारांना तमिळनाडूतील ‘द्रमुक’चे नेते व मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

‘हिंदी शब्द सिंधू’चे प्रकाशन

हिंदी भाषेतील शब्दांचा शब्दकोश यापूर्वी प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये नव्या शब्दांची भर घालून हिंदी शब्द सिंधू या शब्दकोशाचे प्रकाशन या संमेलनात करण्यात आले. या शब्दकोशामध्ये पारंपरिक शब्दांसह तीन लाख ५१ हजार शब्दांचा समावेश आहे. हा शब्दकोश डिजिटल माध्यमात उपलब्ध असून त्यामध्ये युनिकोडचा वापर करण्यात आला आहे.

हिंदीची इतर भारतीय भाषांशी स्पर्धा नाही. उलट, हिंदी प्रादेशिक भाषांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा करेल. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात हिंदीचे मोठे योगदान राहिले असून विविध भाषा आणि बोलींमध्ये विभागलेल्या या देशात हिंदी भाषेने एकात्मतेची भावना निर्माण केली. स्वातंत्र्यलढय़ात हिंदीने ‘संवाद भाषे’ची भूमिका बजावली.- अमित शहा, गृहमंत्री

हिंदीने देशाला एकत्र आणल्याचा शहांचा दावा हास्यास्पद आहे. देशात फक्त चार-पाच राज्यांत हिंदी बोलली जाते. त्यामुळे  शहांचे म्हणणे चुकीचे ठरते. तमिळनाडूमध्ये आम्ही तमिळ बोलतो, केरळमध्ये मल्याळम बोलली जाते. हिंदी आम्हाला कुठे एकत्र आणते? – उदनिधी स्टॅलिन, नेते, द्रमुक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over amit shah insistence on hindi dmk leader udayanidhi stalin objection ysh