नवी दिल्ली : एनसीईआरटीने १२वीच्या पाठ्यपुस्तकांत केलेल्या बदलांवरून वाद निर्माण झाला असतानाच आता ११वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातही महत्त्वाचे बदल केल्याचे समोर आले आहे. ‘मतपेढीचे राजकारण’ या प्रकरणात अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाशी याचा संबंध जोडण्यात आला असून त्यामुळे सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार नाकारला जातो, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील काही प्रकरणांमध्ये २०२३-२४च्या तुलनेत बदल करण्यात आले आहेत. ‘भारतीय धर्मनिरपेक्षतेवर टीका’ या विभागातील ‘मतपेढीचे राजकारण’ या विषयावर दोन परिच्छेद आहेत. ‘अल्पसंख्याकांच्या मतांसाठी धर्मनिरपेक्ष राजकारणी त्यांना हवे ते देऊ शकले, तर ते धर्मनिरपेक्ष धोरणाचे यश असेल व अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्याचा त्यांचा हेतू असेल,’ असा उल्लेख दोन्ही पाठ्यपुस्तकांत आहे. त्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘‘एका गटाचे कल्याण करताना अन्य गटांचे हक्क हिरावले गेले, तर काय? धर्मनिरपेक्ष राजकारण्यांमुळे बहुसंख्यांचे हित धोक्यात आले तर? असे झाल्यास हा वेगळा अन्याय ठरतो,’’

या प्रश्नांच्या उत्तरांत पाठ्यपुस्तकाच्या दोन आवृत्त्यांमध्ये फरक आहे. २०२३-२४च्या आवृत्तीमध्ये मतपेढीचे राजकारण चुकीचे नसले तरी अन्यायाला जन्म देणारे असे राजकारण चूक असल्याचे म्हटले होते. मात्र २०२४-२५च्या आवृत्तीत हा परिच्छेद अधिक वाढविण्यात आला आहे. ‘‘मतपेढीच्या राजकारणामुळे एखाद्या सामाजिक गटाला निवडणुकीच्या वेळी विशिष्ट उमेदवार किंवा राजकीय पक्षाला मोठ्या प्रमाणावर मत देण्यासाठी एकत्रित केले जाते, तेव्हा निवडणुकीचे विकृतीकरण होते. महत्त्वाचे म्हणजे एकगठ्ठा मतदान होते, तेव्हा एक गट ‘एकल युनिट’ म्हणून काम करतो. मतपेढीचे राजकारण करणारे पक्ष किंवा नेते गटाचे हित एक असल्याचा कृत्रिम विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने समाजाच्या दीर्घकालीन विकास आणि शासनाच्या गरजेपेक्षा राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील अल्पकालीन फायद्याला महत्त्व दिले जाते, असा उतारा नव्या पाठ्यपुस्तकात देण्यात आला आहे. या बदलामागील स्पष्टीकरण देताना एनसीईआरटीने म्हटले आहे की, जुन्या पाठ्यपुस्तकात मतपेढीच्या राजकारणाचे केवळ समर्थन केले होते. त्यात बदल केल्याने ‘भारतीय धर्मनिरपेक्षतेवर टीका’ या विभागाचे हेतू साध्य होत आहे.

एनसीईआरटीचे काम संघाच्या संस्थेप्रमाणे – काँग्रेस

२०१४पासून एनसीईआरटी ही संघाची संस्था असल्याप्रमाणे काम करीत आहे, अशी टीका काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी केली. एनसीईआरटी ही आता व्यावसायिक संस्था राहिलेली नाही. ११वीच्या पुस्तकातील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आणि पक्षीय राजकारणावरील टीकात्मक उताऱ्यांवरून ती संघाची एक शाखा म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका रमेश यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर केली.

‘भारत व इंडिया दोन्हीचा वापर’

११वी आणि १२वीच्या राज्यशास्त्र विषयातील बदलांवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. पाठ्यपुस्तकांत ‘भारत’ या शब्दाचा वापर केल्यावरून होत असलेल्या टीकेला एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी सोमवारी उत्तर दिले. ‘देशाच्या राज्यघटनेमध्ये भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातही दोन्ही शब्द वापरण्यास अडचण काय आहे,’ असा सवाल त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over changes in ncert 11th political science textbook amy
Show comments