मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलींच्या सामूहिक विवाहाची योजना वादात अडकली आहे. शनिवारी या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आधी २१९ मुलींची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. २१९ पैकी पाच मुलींची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या पाच मुलींचा विवाह थांबवण्यात आला. या प्रकरणी आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने आता प्रश्न विचारला आहे की ही चाचणी कुणाच्या आदेशावरून करण्यात आली? तसंच भाजपाने महिलांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या एका मुलीने काय म्हटलं आहे?
एका मुलीने हे सांगितलं की, “आज विवाहाच्या आधी माझी प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर माझं नाव यादीतून हटवण्यात आलं. ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं त्याच्यासोबत मी साखरपुड्यानंतर रहात होते. आता माझं नाव या यादीतून हटवण्यात आलं आहे. त्याबाबत मला काहीही कारण दिलेलं नाही.”
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या अंतर्ग दिंडोरीच्या गडसराय या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी आलेल्या सगळ्या मुलींची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. या प्रकरणी गावाचे सरपंच मेदानी यांनी सांगितलं की “या प्रकारची चाचणी याआधी कधी झालेली नाही. आता ज्या मुलींची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्या त्यांच्या कुटुंबीयांच्या नजरेतून उतरल्या आहेत. ” तर याच प्रकरणावर आरोग्य अधिकारी डॉ. रमेश मरावी यांनीही भाष्य केलं आहे.
काय म्हटलं आहे डॉक्टर रमेश मरावी यांनी?
“आम्हाला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यामुळे आम्ही मुलींची प्रेग्नंसी टेस्ट केली. आम्ही फक्त टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट सांगितला. या मुलींना सामूहिक विवाहाच्या प्रक्रियेतून बाहेर काढायचं असेल तर आरोग्य विभागाच्या अहवालाकडून आलेल्या अहवालानंतर सामाजिक न्याय विभागाकडून घेतला जातो.” यानंतर काँग्रेसने असा आरोप केला आहे की प्रेग्नंसी टेस्ट करून भाजपाने महिलांचा अपमान केला आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काय म्हटलं आहे?
“मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विचारू इच्छितो की ही बातमी खरी आहे का? जर ही बातमी खरी असेल तर कुणाच्या आदेशावरून प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली याचं उत्तर द्या. मध्य प्रदेशच्या मुलींचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने या गरीब आदिवासी मुलींची किंमत नाही का? त्यांचा काही आदर नाही का? शिवराज सिंह चौहान यांच्या राज्यात मध्य प्रदेश महिलांचा अपमान करण्यात अग्रेसर आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे”