पीटीआय, नवी दिल्ली

देशातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या ‘नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालया’चे (एनएमएमएल) नाव अधिकृतरीत्या ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय’ (पीएमएमएल) असे बदलण्यात आले आहे. या संस्थेचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने जून महिन्यात घेतला होता. या निर्णयाची सोमवारी अंमलबजावणी करण्यात आली. काँग्रेस व आपने या निर्णयावर जोरदार टीका केली. तर ‘काँग्रेसला नेहरू आणि त्यांच्या घराण्यापलीकडे काही दिसत नाही’, अशी टीका भाजपने केली.

दुसरीकडे, नेहरूवादी वारसा नाकारणे आणि त्याला बदनाम करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकमेव कार्यक्रम आहे अशी जोरदार टीका काँग्रेसने केली. नेहरूंच्या वारशावर सातत्याने हल्ले करण्यात आले तरी हा वारसा कायम राहील आणि पुढील पिढय़ांना प्रेरणा देत राहील असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला. एक्स या समाजमाध्यमावर रमेश यांनी लिहिले की, ‘मोदी हे भीती, न्यूनगंड व असुरक्षितता यांचा मोठा गठ्ठा आहेत, विशेषत: पहिले आणि सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले पंडित नेहरू यांच्याबाबतीत. त्यांनी एन बदलून पी केले.

पण स्वातंत्र्यलढय़ातील नेहरूंचे अवाढव्य योगदान आणि भारतीय राज्यसंस्थेचा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक आणि उदारमतवादी पाया घालण्यातील उत्तुंग कामगिरी ते कमी करू शकणार नाहीत.’ तर ‘एनएमएमएल’चे नाव बदलण्याचा प्रकार अतिशय लाजिरवाणा असून हे क्षुद्र राजकारण आहे अशी टीका दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केली. या टीकेला उत्तर देताना भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. काँग्रेसची विचारप्रक्रिया केवळ नेहरू-गांधी घराण्याभोवतीच फिरते अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी सर्व पंतप्रधानांना आदरपूर्वक स्थान दिले आहे असा दावा त्यांनी केला.

नव्या ‘पीएमएमएल’ या नावातील पी म्हणजे क्षुद्रपणा (पेटिनेस), चिडचिड (पीव्ह) आहे. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस

Story img Loader