कारागृहात असताना आपल्याला एचआयव्ही आणि अन्य विकारांची लागण झाल्याने आपली सुटका करावी आणि ७५ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करणारी याचिका खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
सदर आरोपीची याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळली असून त्याविरुद्ध त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांनी या याचिकेची सुनावणी १७ डिसेंबर रोजी घेण्याचे मुक्रर केले आहे.
पंजाबमधील कारागृहात आपण २००७ पासून असून त्यादरम्यान आपल्याला एचआयव्हीची आणि त्यानंतर एचसीव्हीची लागण झाली, असे आरोपीने याचिकेत म्हटले आहे. खुनाच्या आरोपात आपल्याला दोषी धरण्यात आल्याच्या निर्णयालाही आरोपीने आव्हान दिले आहे.
आपल्याला एचआयव्हीची बाधा झाली त्याला कारागृहातील अधिकाऱ्यांची सदोष पद्धत आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने आपल्याला कारागृहात असताना विकारांची लागण कशी झाली त्याची चौकशी करण्याची मागणीही आरोपीने केली आहे.
मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अन्य कैद्यांना याची बाधा होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, या प्रकारांना आळा घालण्यात आला नाही तर भयानक परिस्थिती ओढवेल, असेही आरोपीने म्हटले आहे.