पीटीआय, चेन्नई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरलेले नलिनी श्रीहरन, तिचा पती आणि इतर तीन जणांची शनिवारी संध्याकाळी तमिळनाडूच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली.राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन, आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा कैद्यांच्या मुदतपूर्व मुक्ततेचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. तमिळनाडू सरकारने त्यांची शिक्षा माफ करण्याची शिफारस केली होती. काँग्रेसने या निकालास विरोध करून, त्याविरुद्ध दाद मागण्याचे ठरवल्याचे शुक्रवारीच जाहीर केले आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ही मुक्तता करण्यात आली.
श्रीलंकेचे नागरिक असलेले मुरुगन, संथन यांना तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील विशेष निर्वासित छावणीत पोलीस वाहनातून सोडण्यात आले. तसेच या प्रकरणातील अन्य दोषी श्रीलंकेचे नागरिक रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना येथील पुझल कारागृहातून मुक्त करण्यात आले व त्यांनाही तिरुचिरापल्ली येथील विशेष निर्वासित छावणीत नेण्यात आले. तत्पूर्वी, या प्रकरणी मेमध्ये सुटका झालेला पेरारिवलनने आपली आई अर्पुथम्मलसह पायस व जयकुमारची पुझल कारागृहात भेट घेतली.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने या हत्येप्रकरणी तीन दशकांहून अधिक काळ जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सहा दोषींची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. या वेळी खंडपीठाने स्पष्ट केले होते, की या खटल्यातील एक दोषी ए. जी. पेरारिवलनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल या इतर कैद्यांबाबतही तितकाच लागू होतो. घटनेच्या अनुच्छेद १४२ अनुसार मिळालेले विशेषाधिकार वापरून सर्वोच्च न्यायालयाने १८ मे रोजी पेरारिवलन यांच्या मुक्ततेचे आदेश दिले होते. अनुच्छेद १४२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालय संपूर्ण न्याय प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेला निर्णय किंवा आदेश देऊ शकते. उर्वरित सहा कैद्यांनी पुरेशी शिक्षा भोगल्याचेही न्यायालयाने या वेळी म्हटले होते.
पतीभेटीदरम्यान नलिनी भावुक
वेल्लोरमधील महिलांसाठी असलेल्या विशेष कारागृहातून सुटका झाल्यानंतर लगेचच नलिनी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात गेली. तेथून तिचा पती व्ही. श्रीहरन ऊर्फ मुरुगनची मुक्तता करण्यात आली. त्याला पाहून नलिनी भावुक झाली होती.