पीटीआय, नवी दिल्ली
पूर्वाश्रमीचे ‘ट्विटर’ अर्थात सध्याच्या ‘एक्स’ या समाजमाध्यमाला भारतीय पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेल्या आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी ‘प्रचार’ केलेले ‘कू’ हे समाजमाध्यम बंद होणार आहे. घटत्या प्रतिसादामुळे आणि आर्थिक चणचणीमुळे ‘कू’ बंद करावे लागत असल्याची घोषणा कंपनीच्या संस्थापकांनी बुधवारी केली.
‘कू’चे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयांक बिदावतका यांनी ‘लिंक्डइन’ या समाजमाध्यमावरून ‘कू’च्या अवतारसमाप्तीविषयीची घोषणा केली. या समाजमाध्यमाला भांडवलपुरवठ्यासाठी बड्या इंटरनेट कंपन्या, उद्याोग समूह, माध्यमसंस्थांशी भागीदारी करण्याविषयीची चर्चा निष्फळ ठरल्यामुळे ‘कू’ सार्वजनिकरित्या बंद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ‘आम्ही २०२२मध्ये ट्विटरला मागे टाकण्याच्या अगदी जवळ होतो आणि अल्पाधीत आम्ही ते ध्येय साध्यही केले असते. मात्र, त्यासाठी पुरेसे भांडवल आम्हाला मिळू शकले नाही,’ असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>काँग्रेस दलित, आदिवासी ओबीसीविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभेत टीका, संविधानाला हरताळ फासल्याचा आरोप
वापरकर्त्यांची माहिती देण्यास नकार देण्यापासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याच्या कारणांमुळे केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर असा वाद रंगला असतानाच, २०२२मध्ये ‘कू’ सुरू करण्यात आले होते. ट्विटरशी साधर्म्य असलेल्या या समाजमाध्यमाची त्यावेळी भारतीय पर्याय म्हणून चांगलीच प्रसिद्धी झाली होती. केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही ‘कू’चे सदस्यत्व घेऊन त्याचा वापर सुरू केला होता.