Delhi Railway Station Stampede: महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी देशभरातून अनेक भाविक प्रयागराजला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रेल्वेगाड्या तुडूंब भरून वाहत आहेत. अशातच शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणारी रेल्वे पकडत असताना चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये ९ महिला, पाच लहान मुले आणि चार पुरुष प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर १० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. मात्र चेंगराचेंगरीची घटना कशी घडली? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावर ४० वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या एका हमालाने कालचा धक्कादायक प्रसंग कसा घडला, हे कथन केले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना एका हमालाने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी काय घडले याची माहिती दिली. ते म्हणाले, “मी १९८१ पासून या स्थानकावर हमालाचे काम करत आहे. मी अशी गर्दी यापूर्वी कधीच पाहिली नाही. प्रयागराजला विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. ही रेल्वे फलाट क्र. १२ वर येणार होती. पण अचानक ती फलाट क्र. १४ वर येईल, अशी सूचना रेल्वेने दिली. त्यामुळे फलाट क्र. १२ वरील प्रवाशांनी फलाट क्र. १६ वर धाव घेतली. तसेच बाहेरून येणारे प्रवाशीही त्याचवेळी फलाट क्र. १४ वर जाऊ लागले. यामुळे सरकते जीने आणि जीन्यावर एकच गर्दी उसळली आणि त्यात चेंगराचेंगरी झाली.”

पोलिसांनी वेळेवर मदत केली नाही

“चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे कळताच सर्व हमाल बंधू धावत आले आणि त्यांनी प्रवाशांना बाजूला करून वाट मोकळी करून दिली. आम्ही फलाटावर पडलेले मृतदेह बाहेर काढून ते रुग्णवाहिकेत टाकले. आम्ही स्वतः १५ मृतदेह रुग्णवाहिकेत टाकले, त्यापुढचे काही माहीत नाही. आम्ही जे फलाटावर पाहिले, ते अतिशय धक्कादायक असे होते. कपडे, चपला, इतर सामान फलाटावर पसरले होते. त्यात मृतदेह पडले होते. हे चित्र इतके भीषण होते की, मला रात्री जेवणही गेले नाही. आम्ही सर्व हमाल तीन तास राबत होतो, पण पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नाही”, असेही या हमालाने म्हटले.

रेल्वेकडून काय सांगितले गेले?

हमाल आणि प्रत्यक्षदर्शींनी आपापल्यापरिने या घटनेवर प्रतिक्रिया दिली असली तरी रेल्वेकडूनही याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, शनिवारी रात्री कोणतीही रेल्वे रद्द झाली नव्हती. फलाट क्र. १४ वर प्रयागराज एक्सप्रेस येणार होती. प्रवाशी या रेल्वेची वाट पाहत होते. यातच फलाट क्र. १२ वर विशेष रेल्वेची घोषणा झाली. यामुळे १४ वरील प्रवाशी फलाट क्र. १२ कडे जाऊ लागले. यातून सदर चेंगराचेंगरीची घटना घडली.

याशिवाय फलाटावर दुकान चालविणाऱ्या रवी नामक व्यक्तीने एएनआयशी बोलताना सांगितले की, चेंगराचेंगरी झाली तेव्हा मी दुकानातच होतो. काल सर्वच रेल्वे उशीराने चालत होत्या. रात्री ९.३० दरम्यान सदर घटना घडली. प्रयागराज आणि मडवाडी या दोन गाड्या एकत्र लागल्या होत्या. जी काही गर्दी झाली ती पुलावर झाली, फलाट मात्र रिकामे होते. विशेष गाडी वेगळ्या पुलावरून जाणार होती, त्यामुळे गर्दी पुलावर अधिक झाली. आम्ही अशी गर्दी कधीच पाहिली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coolie revealed how delhi railway station stampede happened says never seen such a crowd in 40 years kvg