आसाम आणि नागालँड या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात सातत्याने उद्भवणाऱ्या तणावजन्य परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत. ईशान्येकडील राज्यांतर्फे एक संयुक्त यंत्रणा उभारण्यात यावी आणि अशा स्वरूपाचे संघर्ष वेळीच टाळले जावेत, असा निर्णय केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू आणि आसाम व नागालँड या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
नागरिकांच्या मनांत आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी ईशान्य भारतातील सर्व राज्यांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी नियमितपणे समन्वय बैठका घेतील. पूर्वनियोजित पद्धतीने आणि फिरत्या पद्धतीने या बैठका होतील आणि त्यातून एक यंत्रणा शक्य तितक्या तातडीने उभारली जाईल, अशी घोषणा रिजीजू यांनी केली. या वेळी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. झेलियँग उपस्थित होते.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांकडून निर्धारित प्रक्रियेचा भंग झाला असेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रिजीजू यांनी दिले. लोकांमध्ये गैरसमज पसरले आणि त्यातून अफवांना ऊत आला. ज्याची पर्यवसान हिंसाचारात झाले, असे विश्लेषणही केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी केले. या घटनेचे राजकारण करण्यात येणार नाही, तसेच देशविघातक शक्तींना याचा गैरफायदा उचलू देणार नाही, याची खात्री बाळगा असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान सीआरपीएफच्या तुकडय़ांनी आपल्या कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

गोलाघाट येथे पोलिसांचा हवेत गोळीबार
गोलाघाट परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी येथे अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र गुरुवारी सकाळी प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला तसेच अश्रुधुराची नळकांडीही फोडावी लागली. सकाळी प्रक्षुब्ध जमावाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३९ वर ‘चक्का जाम’ करण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर दगडफेकही केली. अखेर या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना कठोर पावले उचलावी लागली, तर गोलाघाट ते रंगजन, बोकाघाट ते नुमलिंगढ या रस्त्यांवर लष्कराने ध्वजसंचलनही केले.

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पीटीआय, गुवाहाटी : आसाम आणि नागालॅण्डच्या सीमेवर सध्याच्या हिंसक तणावावर उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रितरीत्या बसून विचारविमर्ष केला तरच त्यावर एकमताने सर्वमान्य असा तोडगा निघेल आणि तोच एकमेव मार्ग आहे, असे मत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाची मदत व सहकार्य घेऊन या मुद्दय़ावर उभयपक्षात मान्य होईल असा तोडगा शोधावा, असे आवाहन सरकार यांनी केले. आपल्या नागरिकांनी योग्य रीतीने विचार करून मतभेदांचे निराकरण करण्यासंबंधी उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांचे मन वळवावे, अशीही सूचना सरकार यांनी केली.आसाम आणि नागालॅण्डच्या सीमेवरील हिंसक तणाव ही काही चांगली बाब नाही. आपणा सर्वासाठीच ही चिंतेची बाब असून या दोन्ही राज्यांचे लोक आपसात का भांडत असतात, अशी विचारणा करून यासंदर्भात केंद्रीय दलाची उपस्थिती साहाय्यभूत ठरू शकेल, असे मत सरकार यांनी मांडले.

नेमके प्रकरण काय आहे?
१२ ऑगस्ट रोजी उरीमघाट जिल्ह्य़ात काही लोकांनी गोळीबार केला. या गोळीबारात ९ जण ठार झाले, तर त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये २०० घरे पेटविली गेली. ज्यामुळे १०,००० हून अधिक लोक बेघर झाले. हा गोळीबार शेजारच्याच नागालॅण्ड राज्यातून करण्यात आला असा आरोप आहे. त्यानंतर गोलाघाट येथे सीआरपीएफ जवानांच्या गोळीबारात तीन जण ठार, तर ६ जण जखमी झाले. त्यानंतर जमावाने उपायुक्तांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी झालेल्या पोलीस कारवाईत २२ नागरिक जखमी झाले. त्यामुळे या परिसरात अशांतता पसरली आहे.

Story img Loader