ओडिशा राज्यात एक धक्कादायक घटना काल घडली. राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबकिशोर दास (६०) यांच्यावर सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपालकृष्ण दास याने गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये नबकिशोर दास यांचा मृत्यू झाला. आरोपी गोपाल दास हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा आता त्याच्या पत्नीने केला आहे. गोपालकृष्ण दास बायपोलर डिसऑर्डर या आजाराने ग्रस्त असून मागच्या आठ वर्षांपासून तो उपचार घेत असल्याचेही पत्नीने सांगितले. यासोबतच ब्रह्मपुर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे मनोचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर त्रिपाठी यांनी देखील गोपालकृष्ण दास मनोरुग्ण होता, असे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले की, दास दहावर्षांपूर्वी माझ्याकडे उपचार घेण्यासाठी आला होता. त्याला खूप लवकर राग यायचा. त्याच्यावर मी उपचार करत होतो. मात्र तो औषधे वेळेवर घेत होता की नाही याबाबत मला खात्री नाही. जर औषधे वेळेवर घेतले नाहीत, तर हा आजार पुन्हा उसळू शकतो. गोपालकृष्ण अखेरचा माझ्याकडे वर्षभरापूर्वी आला होता. त्यानंतर तो भेटायला आला नाही. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, बायपोलर डिसऑर्डरमध्ये रुग्णाच्या वर्तनात अचानक बदल होतात. कधी रुग्ण अतिशय आनंदी असतो तर कधी खूप तणावात जातो. या आजारामध्ये औषधे आणि समुपदेशन दोन्ही खूप गरजेचे असते.

तर गोपालकृष्णच्या पत्नीने सांगितले की, माझ्या पतीचे आणि मंत्र्यांचे वैयक्तिक काही शत्रुत्व नव्हते. गोपाल औषधे घेत होता आणि सामान्य वर्तन करत होता. या घटनेच्या काही वेळ आधीच त्याने आपल्या मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला होता. मात्र अचानक असं काय झालं की, त्यांनी मंत्र्यांवर गोळी झाडली? याबाबत मला कल्पना नाही. गोपालकृष्ण दास हा गंजाम जिल्ह्यातील जलेश्वरखंडी गावात राहणारा होता. पोलिस शिपायापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पोलिस सहायक उप निरीक्षक पदावर बढती झाल्यानंतर त्याला शस्त्र देण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपालकृष्ण दास याला रविवारी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. मंत्री दास हे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपल्या गाडीतून उतरले तेव्हा गोपालकृष्णने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी मंत्री दास यांना लागली. यानंतर गोपालकृष्णने हवेत गोळीबार करुन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला पकडले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cop who shot odisha minister was being treated for mental illness says wife kvg