‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया’ अर्थात ‘इसिस’चे आकर्षण वाटून त्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याला हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र चौकशी करून त्याला नंतर जाऊ देण्यात आले.
‘गुगल’चा माजी कर्मचारी मुनावाद सलमान याला सोशल नेटवर्किंग मीडियाच्या माध्यमातून इसिसबद्दल माहिती मिळाली होती. त्या आकर्षणातूनच त्याने इसिसमध्ये भरती होण्याचे ठरवले होते. तो सोशल नेटवर्किंग साइट्सवरील इसिसच्या पोस्ट नियमितपणे वाचत असे. इसिसमध्ये दाखल होण्याचे त्याने निश्चित केले होते, अशी माहिती हैदराबाद पोलिसांच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सलमान गुगलच्या हैदराबाद येथील कार्यालयात काम करीत होता. सुमारे ७ महिन्यांपूर्वी त्याने ही नोकरी सोडली होती. तो सौदी अरेबियाला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्या पालकांनाही बोलावून घेऊन त्यांच्या समक्ष त्याला समजावून सुधारण्याचा सल्ला देण्यात आला. अशा कारवायांमध्ये सहभागी न होण्याबाबतही त्याला बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा