Chennai Coromandel Express Accident Updates: ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २६१ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. ANI या विषयीचे वृत्त दिले आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर ही ५० झाली आता ANI ने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २६१ इतकी झाली आहे. तीन ट्रेन्सचा अपघात झाल्याने या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अपघाताच्या प्रत्येक अपडेट्स
Odisha Train Accident Live Updates, 3 June 2023 | तीन ट्रेनच्या अपघाताने हादरलं ओडिशा, २३५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू; जाणून घ्या प्रत्येक अपडेट
ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचे प्राण गेले असून ९०० हून अधिक जण जखमी आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळावर सर्व पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींना भेटण्यासाठी थेट रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. त्यांनी प्रत्यक्षात जखमींसोबत संवाद साधला असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.
ओडिशामध्ये तीन ट्रेन्सचा अपघात कसा झाला त्याची चौकशी झाली पाहिजे. खोटारड्या सरकारच्या खोटारड्या तांत्रिक व्यवस्थेमुळे लोकांचा बळी गेला आहे. हा महाघोटाळा आहे, या महाघोटाळ्याची, भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशामध्ये दाखल. बालासोर या अपघाताच्या ठिकाणी दिली भेट. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कटक या ठिकाणी जाऊन ट्रेन अपघातातल्या जखमी रुग्णांची भेट घेणार आहेत.
ओडिशामध्ये झालेल्या अपघाताविषयी राज ठाकरेंनी एक ट्वीट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतातल्या ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला. अनेकांनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे त्या कुटुंबासह आमच्या संवेदना आहेत. जे लोक जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना मी करतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
ओडिशातील अपघाताविषयी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ओडिशात झालेल्या अपघातात आत्तापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
ओडिशा अपघातातील मृतांची संख्या २६१ झाली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ओडिशामध्ये शुक्रवारी तीन ट्रेन्सचा अपघात झाला आहे. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढते आहे.
ओडिशाचा अपघात अत्यंत वेदनादायी आहे. कुठल्याही प्रकारचं राजकारण करण्याची ही वेळ नाही असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी या ओडिशामध्ये आल्या आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच त्यांनी जखमींची विचारपूसही केली. आमच्या राज्याकडून आम्ही मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच बंगालहून आम्ही डॉक्टरांचं पथकही पाठवलं आहे. असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
ओडिशामधील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी (२ जून) रात्री कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात २३८ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. ते शनिवारी (३ जून) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
ओडिशात बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेससह आणखी एक प्रवासी गाडी आणि मालगाडीची धडक झाली. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या.
ओडिशामध्ये झालेल्या अपघातानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ओडिशा दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी जाऊन त्या जखमींची विचारपूस करणार आहेत. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. जखमींना नवीन पटनायक हे भेटायला काही वेळापूर्वीच आले होते. ANI ने याविषयीची माहिती दिली आहे.
क्रिकेटर विराट कोहलीने ओडिशा घटनेविषयी दुःख व्यक्त केलं आहे. अपघाताची घटना पाहून आणि ऐकून अत्यंत दुःख झालं असं म्हणत त्याने ट्वीट केलं आहे.
ओडिशामध्ये तीन ट्रेन्सचा अपघात झाला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचा दौरा करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ओडिशामध्ये जाऊन अपघातातीली जखमींची विचारपूस करणार आहेत. ओडिशा मेडिकल कॉलेज रुग्णालयात ते जाणार आहेत. ANI ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
ओडिशामध्ये तीन ट्रेन्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आत्तापर्यंत २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसंच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. या घटनेनंतर आता तिथली ड्रोन दृश्यंही समोर आली आहेत.
ओडिशामधील बालेश्वरजवळ शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेचे वृत्त क्लेशदायक आहे. असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या अपघातात बळी पडलेल्या दुर्दैवी प्रवाशांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली. हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. अशी आदरांजलीही त्यांनी वाहिली आहे.
ओडिशातील रेल्वे अपघाताची घटना ही अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे या आशायचं ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
ओडिशातील रेल्वे अपघाताविषयी शरद पवार यांनी व्यक्त केला शोक. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयासह आहेत या आशयाचं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.
ओडिशामध्ये झालेली ट्रेन दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे असं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेनंतर आम्हाला मदत करणाऱ्या स्थानिक पथकांचे, पोलिसांचे, लोकांचे, एनडीआरएफच्या टीमचे मी धन्यवाद देतो असं त्यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
ओडिशामध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जी घटना घडली त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसंच जे मृत्यू या दुर्घटनेत झाले त्याबाबत मला अतीव दुःख झालं असंही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान बालासोरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी या ठिकाणी ट्रेन अपघातातल्या जखमींना भेट दिली. त्यांची विचारपूस केली आहे.