देशात व्यापक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ वर्षांपासून पुढच्या सर्व वयोगटातल्या व्यक्तींना सध्या मोफत लसीकरण सुरू आहे. त्यामुळे एकीकडे लसीकणातला वेग वाढत असताना दुसरीकडे रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांच्या संख्येत आज सलग चौथ्या दिवशी घट दिसून आली. त्यामुळे हा सरकार, प्रशासन आणि नागरिकांसाठी देखील दिलासा ठरला आहे. गुरुवारी १ जुलै रोजी ४८ हजार ७८६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. २ जुलै रोजी हा आकडा ४६ हजार ६१७ नोंदवण्यात आला. ३ जुलै रोजी ही संख्या ४४ हजार १११ इतकी खाली आल्यानंतर आज चौथ्या दिवशी ४३ हजार ०७१ इतक्या नव्या करोनाबाधितांचा आकडा नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमधली ही आकडेवारी असून रुग्णसंख्या हळूहळू घटत असल्याचं यावरून दिसून येत आहे.

 

रविवारच्या आकडेवारीनंतर देशात करोनाबाधितांचा आजपर्यंतचा आकडा आता ३ कोटींच्या वर गेला असून ही संख्या ३ कोटी ५ लाख ४५ हजार ४३३ इतकी झाली आहे.

मृतांच्या संख्येत वाढ!

दरम्यान, एकीकडे नव्या करोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्याआधीच्या २४ तासांमध्ये ७३८ मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९५५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोना मृतांचा आकडा ४ लाख २ हजार ००५ इतका झाला आहे.

Story img Loader