बीजिंग : चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून बीजिंगमध्ये रुग्णशय्याच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अनेक वृद्ध रुग्ण रुग्णालयाच्या आवारात स्ट्रेचरवर उपचार घेत आहेत, तर काही जणांना व्हीलचेअरवरच प्राणवायू लावण्यात आलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीजिंग शहराच्या पूर्वेकडील चुईयांगलीयू रुग्णालय गुरुवारी नव्याने आलेल्या रुग्णांनी खचाखच भरले होते. गुरुवारी सकाळीच रुग्णशय्या संपल्या होत्या तरीही रुग्णवाहिका रुग्णांना आणत होत्या. डॉक्टर आणि परिचारिकांकडून अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांचीच तपासणी करण्यात येत होती. चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक देशांनी चिनी प्रवाशांवर निर्बंध लादले असून चीनमधून प्रवास करणाऱ्यांना करोना चाचणीचा अहवाल उपलब्ध करणे सक्तीचे केले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ओमायक्रॉनचे ११ उपप्रकार

नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार सापडल्यानंतर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत असून २४ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान करोनाबाधित असलेल्या १२४ आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ११ ओमायक्रॉनचे उपप्रकार आढळले आहेत. सरकारी सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.

या कालावधीत विमानतळे व सागरी बंदरे या ठिकाणी १९,२२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी १२४ करोनाबाधित आढळले असून त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १२४ करोनाबाधित नमुन्यांपैकी ४० जणांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले. त्यापैकी १४ नुमन्यांमध्ये ‘एक्सबीबी’ आणि एका नमुन्यात ‘बीएफ ७.४.१’ हा उपप्रकार आढळला आहे.

२४ डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांसाठी सरकारने यादृच्छिक करोना चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. याशिवाय चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १ जानेवारीपासून करोना निगेटिव्ह अहवाल देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona cases rapidly increasing in china covid surge in china covid 19 cases rising in china zws