देशात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. दुसरी लाट देशभरात ओसरल्याचं चित्र दिसतंय. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ११ हजार ९०३ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या सोमवारी पेक्षा तुलनेने थोडी जास्त आहे. सोमवारी देशात १० हजार ४२३ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर, ४४३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येसह ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १४ हजार १५९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.
देशात सध्या १ लाख ५१ हजार २०९ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. ही सक्रिय रुग्णसंख्या गेल्या २५२ दिवसांतील सर्वात कमी आहे. देशभरात आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ७४० जण करोनातून बरे झाले आहेत.
गेल्या २४ तासांत देशात ४१ लाख १६ हजार २३० जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १०७ कोटी २९ लाख ६६ हजार ३१६ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.
राज्यातील परिस्थिती..
राज्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ९५ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १ हजार ७८ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर, ४८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५३,५८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५९ टक्के एवढे झाले आहे.