२०१९-२० या वर्षांमध्ये करोनानं जगभरात थैमान घातलं होतं. कोट्यवधी माणसं करोनामुळे दगावली. असंख्य लोकांना गंभीर व्याधी जडल्या. काहींवर अद्याप उपचार चालू आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात करोनाचा जोर मोठ्या प्रमाणावर ओसरल्याचं चित्र जगभरात दिसत आहे. मात्र, त्याचवेळी अमेरिकेत वेगळंच चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात सीडीसी या संस्थेनं सतर्कतेचा इशारा दिला आहे. ही कदाचित करोनाच्या नव्या लाटेची सुरुवात ठरू शकते, असं निरीक्षण या संस्थेनं नोंदवलं आहे.
काय घडतंय अमेरिकेत?
अमेरिकेत गेल्या आठवड्याभरात करोनामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या तब्बल १० टक्क्यांनी अचानक वाढली आहे. १५ जुलैच्या आठवड्यात करोनामुळे तब्बल ७ हजार १०० रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं. त्याआधीच्या आठवड्यात हाच आकडा ६ हजार ४४४ रुग्ण इतका कमी होता. त्याशिवाय, कोविडसंदर्भातल्या इमर्जन्सी रुम्सची मागणीही वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
“गेल्या सहा ते सात महिन्यांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र. आता अचानक रुग्णांची संख्या वाढू लागल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक आठवड्यांमध्ये गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच करोना रुग्णभरतीचा आकडा वाढल्याचं निदर्शनास आलं आहे”, अशी माहिती सीडीसीचे कोविड व्यवस्थापक डॉ. बँडन जॅकसन यांनी दिल्याचं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
“ही कदाचित करोनाच्या नव्या लाटेची सुरुवात ठरू शकते”, अशी भीतीही जॅकसन यांनी व्यक्त केली आहे.
एकूण करोना रुग्णांची संख्या अजूनही कमी!
दरम्यान, एकीकडे अमेरिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असली, तरी एकूण करोना रुग्णांची संख्या मात्र अजूनही आत्तापर्यंतची सर्वात कमी असल्याचं सीडीसीच्या प्रवक्त्या कॅथलीन कॉनले यांनी म्हटलं आहे. “सरासरी करोनाबाधितांची संख्या अजूनही आत्तापर्यंतची सर्वात कमी संख्या आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या व्याधींमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही सातत्याने कमी होताना दिसत आहे”, असं त्या म्हणाल्या.