भारतासाठी काहीशी चिंताजनक बाब आहे. देशातील करोना रुग्णांच्या संख्येत आज (१८ एप्रिल) ८९.८ टक्के इतकी मोठी वाढ झालीय. त्यामुळे करोनाची आणखी एक लाट येणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. रविवारी (१७ एप्रिल) देशातील करोना रुग्णांची संख्या १ हजार १५० इतकी होती. मात्र, मागील २४ तासात या रुग्णसंख्येत जवळपास ९० टक्के वाढ झाली.
मागील २४ तासात २१४ करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात केरळच्या २१२ नोंद राहिलेल्या करोना रुग्णांच्या मृत्यूंचा समावेश आहे. न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या प्रकरणांमधील ६२ मृत्यू (Backlog) आणि १३ ते १६ एप्रिल दरम्यानचे केरळमधील १५० करोना मृत्यू असे मिळून हे २१२ मृत्यू आहेत. त्यामुळे दररोजच्या करोना मृत्यूत देखील अचानक वाढ होऊन हा आकडा २१४ वर गेला. यात रविवारच्या चार मृत्यूंचा समावेश आहे.
आतापर्यंत भारतात एकूण ४.३० कोटी करोना रुग्ण आढळले
भारतात सध्या दैनंदिन करोना विषाणूच्या संसर्गाचा दर ०.३१ वरून ०.८३ वर गेलाय. दुसरीकडे देशातील सध्या सक्रीय करोना रुग्णांची संख्या ११ हजार ५५८ वरून ११ हजार ५४२ वर गेलीय. म्हणजे या संख्येत १६ रुग्णांची घट आहे. करोनाच्या साथीरोगाला सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत भारतात एकूण ४.३० कोटी करोना रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा : COVID Vaccination : ‘बूस्टर डोस’ संदर्भात अदर पूनावालांचं मोठं विधान, म्हणाले…
राजधानी दिल्लीत ५१७ करोना रुग्णांची नोंद झालीय. रविवारच्या बुलेटिननुसार दिल्लीत सध्या एकूण १५१८ करोना रुग्ण आहेत. ही संख्या ३ मार्च २०२२ नंतरची सर्वाधिक आहे. दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा या भागात अनेक विद्यार्थी करोनाबाधित निघत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काळजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काही शाळा बंदही कराव्या लागल्या आहेत.