देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिल्यानंतर वादाला फोडणी मिळाली आहे. त्यानंतर राज्याने आकडेवारी दिली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं होतं. “ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अहवालात दिलेली नाही, आरोग्य हा राज्याचा विषय आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश रोज आकडे केंद्र सरकारला देत असतं. तीच आकडेवारी केंद्र सरकार देत असतं.”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून जोरदार टीका करण्यात आली होती. विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. आता या वादानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. आता केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१३ ऑगस्टला संसदेचं पावसाळी अधिवेशन संपणार आहे. तत्पूर्वी राज्यांकडून आकडेवारी घेऊन संसदेच्या पटलावर मांडली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. करोनामुळे दिल्ली, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि हरयाणात ऑक्सिजन तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती.
Corona : करोनाची रुग्णसंख्या कमी होईना; केंद्राला चिंता देशातल्या २२ जिल्ह्यांची!
दुसरीकडे देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. देशात चार महिन्यांनंतर करोना रुग्णसंख्या ३० हजारांहून कमी नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३६३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.यापूर्वी देशात सोमवारी ३९ हजार ३६१ आणि रविवारी ३९ हजार ७४२ नवीन करोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आजची आकडेवारी दिलासादायक आहे. तसेच देशात सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे.