Corona Update in Marathi : देशात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. करोनाचा सब व्हेरियंट JN.1 चा प्रसार वेगाने पसरू लागल्यानं करोनाचाही संसर्ग होऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ३३५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, रविवारी पाच करोनाबाधितांचा मृत्यूही झाला आहे. गेल्यावर्षीपासून करोनाच्या रुग्णासंख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
पाच मृत्यूंपैकी चार मृत्यू एकट्या केरळमध्ये आहेत. तसंच, JN.1 हा सब व्हेरियंटसुद्धा केरळमध्येच आढळून आला आहे. त्यामुळे केरळ राज्यात सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत. तर एक मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. दरम्यान, रविवारी ३३५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या १७०१ झाली आहे.
हेही वाचा >> केरळमध्ये करोनाच्या नव्या ‘जेएन१’ विषाणूचा रुग्ण
२०१९ पासून देशात करोनाचा संसर्ग पसरू लागला. तेव्हापासून देशात आतापर्यंत ४.५० कोटी लोकांना करोनाची लागण झाली. यापैकी, ४.४६ करोना बाधितांनी यशस्वी मात केली. तर, ५ लाख ३३ हजार ३१६ बाधितांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ देशात करोनापासून बरे होण्याचं प्रमाण ९८.८१ टक्के असून मृत्यूचं प्रमाण १.१९ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केरळमध्ये करोनाच्या नव्या ‘जेएन१’ विषाणूचा रुग्ण
करोनाचे विषाणू सातत्याने स्वत:मध्ये बदल घडवून आणत आहेत. त्यामुळे नवनव्या विषाणूंची उत्पत्ती होत आहे. करोनाचा नवा विषाणू असलेल्या ‘जेएन १’चे रुग्ण चीन आणि अमेरिकेमध्ये सापडत असून त्याचा पहिला रुग्ण भारतामधील केरळमध्ये सापडला आहे. भारतीय सार्स करोना जिनोमिक कर्न्सोटियम अंतर्गत सुरू असलेल्या करोना चाचणीदरम्यान ७९ वर्षीय महिलेला ‘जेएन १’ची बाधा झाल्याचे आढळले.
केरळमधील थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी एका वृद्ध महिलेला ‘जेएन १’ची बाधा झाल्याचे निदर्शनास आले.या महिलेची १८ नोव्हेंबर रोजी करोनाविषयक (आरटीपीसीआर) चाचणी करण्यात आली. तिला सौम्य प्रकारची लक्षणे आढळली होती. तसेच तिला थोडासा अशक्तपणाही जाणवत होता. मात्र आता तिची प्रकृती उत्तम असल्याची मााहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महाव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली.
‘काळजी करण्याचे कारण नाही’
‘‘केरळमध्ये आढळलेल्या ‘कोविड-१९’च्या विषाणूचा ‘जेएन.१’ या उपप्रकार चिंताजनक नाही,’’ असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर तपासणी केलेल्या भारतीय प्रवाशांमध्ये हा उपप्रकार सापडला. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे, काळजीचे कारण नाही, असे जॉर्ज यांनी सांगितले.