चीनमध्ये करोनाला रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात असून यावेळी संशयित रुग्णांना क्वारंटाइन कॅम्पमध्ये ठेवलं जात आहे. मात्र यावेळी चीनने रुग्णांना ठेवण्याठी धातूच्या बॉक्सचा वापर केला असल्याने वाद निर्माण झाला आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये मोठ्या संख्येने धातूचे बॉक्स दिसत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील दृश्याप्रमाणे भासणारा हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. करोनाचा एकही रुग्ण आढळू नये यासाठी चीनने कठोर नियम लागू केले असून हा त्याचाच एक भाग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी क्वारंटाइन सेंटरच्या बाहेर रुग्णांना घेऊन आलेल्या बसेसचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये सेंटरबाहेर बसेसची मोठी रांग लागल्याचं दिसत आहे.

करोनाला रोखण्यासाठी चीनने ‘झिरो कोविड’ मोहिमेअंतर्गत नागरिकांवर अनेक कठोर निर्बंध लावले आहेत. विशेष म्हणजे चीनमध्ये पुढील महिन्यात ऑलिम्पिक होणार आहे. त्यामुळे एकीकडे ऑलिम्पिकची तयारी सुरु असताना दुसरीकडे लाखो लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं जात आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, परिसरात एकही रुग्ण सापडला तरी गरोदर महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या धातूंच्या बॉक्समध्ये राहण्याची जबरदस्ती केली जात आहे. या बॉक्समध्ये लाकडाचा बेड आणि शौचालय उपलब्ध आहे. जास्तीत जास्त दोन आठवडे ते वापरले जाऊ शकतात.

अनेक ठिकाणी तर रहिवाशांना मध्यरात्री घर सोडून क्वारंटाइन सेंटरमध्ये जायचं असल्याचं सांगण्यात आलं. चीनमध्ये ट्रॅक अॅण्ड ट्रेस मोहीम राबवली जात असून यामध्ये संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ क्वारंटाइन केलं जात आहे.

रिपोर्टनुसार, चीनमध्ये २ कोटी लोकांना त्यांच्या घऱात बंदिस्त करण्यात आलं असून घराबाहेर पडण्याची अजिबात परवानगी नाही. अन्न विकत घेण्यासाठीही ते घराबाहेर पडू शकत नाहीत.

लॉकडाउनमुळे वैद्यकीय उपचार मिळण्यात उशीर झाल्याने एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. यामुळे चीनमधील कठोर निर्बंधांवरुन वाद निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

चीनमध्ये २०१९ मध्ये सर्वात प्रथम करोनाचा रुग्ण सापडला होता. तेव्हापासून करोनाला रोखण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला जात आहे. हा लॉकडाउन फार कडक असून जर कोणी रुग्णाच्या संपर्कात आले असतील तर त्यांना घरातून किंवा हॉटेलमधून बाहेर पडण्याची अजिबात परवानगी नसते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona people forced to live in metal boxes under chinas zero covid rule sgy