पीटीआय, बीजिंग : जनआंदोलन आणि व्यापक निषेधानंतर चीनने बुधवारी करोना निर्बंध शिथिल केले. चीन सरकारने लागू केलेले शून्य कोविड धोरण रद्द करण्याच्या दिशेनेही सरकारने पावले उचलली आहेत. या धोरणामुळे अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर विपरित परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याने सरकारने ‘शून्य कोविड धोरण’ लागू केले. या धोरणामुळे टाळेबंदी आणि विविध निर्बंध लादण्यात आल्याने जनतेने संताप व्यक्त केला. चिनी सरकारच्या या धोरणामुळे बीजिंग, शांघायसह अनेक प्रमुख शहरांमधील लाखो नागरिकांना त्यांच्या सदनिका किंवा घरात बंदिस्त राहावे लागते. त्याशिवाय अनेकांना रोजगारासाठी घराबाहेर पडण्यासही बंदी असल्याने या दडपशाहीला जनतेने तीव्र विरोध केला.