मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. येथे करोना संसर्गाच्या नव्या लाटेने थैमान घातले आहे. येथे रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये अपुरे पडत असल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी तेथील परिस्थिती नेमकी कशी आहे, याची योग्य आणि स्पष्ट माहिती चीन सरकारकडून दिली जात नाहीये. असे असतानाच करोनाविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे प्रमुख एन के अरोरा एन के अरोरा यांनी चीनमधील करोना स्थितीवर मोठे भाष्य केले आहे. चीनमध्ये एक नव्हे तर अनेक उपप्रकारांमुळे करोनाचा उद्रेक झाला आहे, असे अरोरा यांनी सांगितले आहे. तसेच चीनकडून करोना संसर्गाची कारणे, करोनाचे उपप्रकार तसेच अन्य बाबींची स्पष्ट माहिती दिली जात नसल्यामुळे आपण खबरदारी म्हणून योग्य ती पावलं उचलत आहोत, असेही अरोरा यांनी सांगितले.
हेही वाचा >> Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या चीनमध्ये १५ टक्के रुग्णांना बीएफ ७ करोना उपप्रकाराचा संसर्ग झालेला आहे. तर बहुतांश म्हणजेच ५० टक्के रुग्णांना बीएन आणि बीक्यू या करोना उपप्रकाराची लागण झालेली आहे. एसव्हीव्ही या उपप्रकाराची १० ते १५ टक्के रुग्णांना लागण झालेली आहे. तसेच चीनमध्ये देण्यात आलेली लस जास्त परिणामकारक नसावी, असेही अरोरा यांनी सांगितले. “चीनमधील लोकांनी करोनाचा सामना केलेला नाही. या विषाणूविरोधात लढण्याची चीनमधील लोकांमध्ये कमी क्षमता आहे. तेथील लोकांनी लसीचे जवळपास तीन ते चार डोस घेतलेले आहेत. त्यांची लस कमी परिणामकारक असावी,” असे अरोरा म्हणाले.
भारतीय लोकांमध्ये तुलनेने करोनाविरोधत लढा देण्याची क्षमता जास्त असल्याचेही अरोरा यांनी सांगितले. “भारतातील ९७ टक्के लोकांनी करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. भारतात लहान मुलेदेखील सुरक्षित आहेत. १२ वर्षांखालील जवळपास ९६ टक्के मुलांनी करोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे,” असे अरोरा म्हणाले.
हेही वाचा >> देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव
चीनमधील करोना स्थितीविषयी सध्यातरी अस्पष्टता आहे. चीनमधील करोनाग्रस्तांची संख्या, विषाणू किती घातक आहे, तेथील लसीकरणाची स्थिती याबाबत ठोस आणि स्पष्ट माहिती दिली जात नाहीये. याच कारणामुळे भारताकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे, असेही अरोरा यांनी सांगितले.