जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भितीचं वातावरण आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणं बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. शिवाय, ओमायक्रॉन वेगाने प्रसारीत होणारा व्हेरिएंट असल्यामुळे अवघ्या २० दिवसांत तो ५७ देशांमध्ये पसरला आहे. मात्र, असं असताना दुसरीकडे व्यापक लसीकरण झाल्यामुळे लोकांमध्ये करोनाबाबतच्या नियमाकडे काहीसं दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसून येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांना नीती आयोग आणि करोनाबाबतच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गंभीर इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य विभागानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार आणि भारतीयांकडून करोनाच्या नियमांकडे होणारं दुर्लक्ष यावर भाष्य करताना चिंता व्यक्त केली आहे. “भारतात मास्क घालण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागलं आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. आपण जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवं. आपण सध्या या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहोत आणि अतिशय जोखमीच्या आणि अस्वीकारार्ह अशा पद्धतीने वर्तणूक होऊ लागली आहे”, असं व्ही. के. पॉल यांनी नमूद केलं.

मास्क काढण्याची वेळ अजून आलेली नाही

डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशवासीयांना मास्क न काढण्याचं आवाहन केलं आहे. “जागतिक आरोग्य संघटना सातत्याने मास्कचा वापर कमी होत असल्याबद्दल सतर्क करत आहे. ओमायक्रॉनचा जागतिक पातळीवर वेगाने होणारा प्रसार चिंता वाढवणारा आहे. मास्क आणि लस या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून अद्याप मास्क काढण्याची वेळ आलेली नाही”, असं त्यांनी नमूद केलं.

करोनाची साथ आणि अनपेक्षित गोष्टी

दरम्यान, यावेळी बोलताना डॉ. व्ही. के. पॉल यांनी करोनाच्या साथीमध्ये अनेक सरप्राईजेस असल्याचं सांगितलं. “ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटन आणि फ्रान्समध्ये करोनाची मोठी लाट आली आहे. करोनाच्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खूप साऱ्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणं फार आवश्यक आहे”, असं ते म्हणाले.

“अजिबात वाट पाहू नका, आत्ता लगेच पावलं उचला”, ओमायक्रॉनबाबत WHO च्या संचालकांचा गंभीर इशारा; संपूर्ण जगाला केलं सतर्क!

करोना व्हेरिएंट अजून इतके स्मार्ट झाले नाहीत की…

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर चिंता व्यक्त केली जात असताना सध्या अस्तित्वात असलेल्या लसी ओमायक्रॉनवर प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर डॉ. पॉल यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. “सध्याच्या लसी करोनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील. करोनाचे व्हेरिएंट अजून इतके स्मार्ट झालेले नाहीत की ते लसीमुळे तयार झालेलं सुरक्षा कवच भेदू शकतील”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona task force dr paul express concerns over mask usage in india pmw
Show comments