देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार होतांना दिसत आहे. सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर रुग्णसंख्या घटली आहे. देशभरात गेल्या चोवीस तासांत करोनाच्या ३५ हजार ३४२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४८३ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात ४ लाख ०५ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३५ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली. तर ३८ हजार ७४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या देशात ४ लाख ०५ हजार ५५३ रुग्णांवर उपचास सुरु आहेत.

आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ९३ हजार ०६२ करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख ६८ हजार ०७९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख १९ हजार ४७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लसीकरणाने देखील देशात जोर पकडला आहे. देशात ४२ कोटी ३४ लाख १७ हजार ०३० लसीचे डोस देण्यात आले आहेत.

राज्यांकडे ३.२० कोटी लसमात्रा शिल्लक

केंद्रशासित प्रदेश, राज्ये आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३ कोटी २० लाख लसमात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.  आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४३ कोटी ७९ लाख ७८ हजार ९०० लसमात्रा पुरवण्यात आल्या असून अजून ७ लाख मात्रा लवकरच देण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध साठ्यानुसार वाया गेलेल्या लसमात्रांसह आतापर्यंत एकूण ४० कोटी ५९ लाख ७७ हजार ४१० लसमात्रांचा वापर करण्यात आला आहे. तर ३ कोटी २० लाख १ हजार ४९० लसमात्रा शिल्लक आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.