देशात करोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मात्र, तज्ज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारीचा इशारा दिला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात १२५ दिवसातील सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद झाली. तसेच बाधित रुग्णांपेक्षा करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

देशात गेल्या २४ तासात ३० हजार ९३ करोना रुग्ण आढळले. तर ४५ हजार २५४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ३७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ६ हजार १३० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

आतापर्यंत देशात ३,११,७४,३२२ करोना रुग्ण आढळले आहेत. तर ३,०३,५३,७१० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ४,१४,४८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

नव्या रुग्णांत ८० टक्के ‘डेल्टा’चे

नव्याने सापडत असलेल्या करोना रुग्णात ८० टक्के जणांना डेल्टा या उपप्रकाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, असे सार्स सीओव्ही जिनॉमिक्स कॉन्सर्टियमचे सह अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितले. रुग्णांची संख्या जर नवीन उपप्रकार आले तर वाढू शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

अल्फा या उपप्रकारापेक्षा डेल्टा हा उपप्रकार  ४०-६० टक्के अधिक संसर्गजन्य असून तो आता ८० देशात पसरला आहे. त्यात ब्रिटन, अमेरिका व सिंगापूर यांचा समावेश आहे. डेल्टा प्लसचे एवाय १ व एवाय २ हे प्रकार ११ राज्यातील ५५-६० टक्के  रुग्णात दिसून आले आहे.  महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांचा त्यात समावेश आहे. या विषाणूची प्रसार क्षमता व इतर बाबी तसेच लशींना प्रतिकार करण्याची त्याची क्षमता याबाबत अभ्यास सुरू आहे, असे डॉ. अरोरा यांनी म्हटले असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

२४ दिवसांत ३० ते ४० कोटी लोकांचे लसीकरण

सर्वाना मोफत लस मोहिमेत गेल्या २४ दिवसांत ३०-४० कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले असून याउलट आधीच्या काळात १० कोटी लोकांचे लसीकरण करण्यास ८५ दिवस लागले होते असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोविड १९ लसीकरणात २१ जूनपासून नवा टप्पा सुरू होत आहे. जास्त लशी उपलब्ध करून मोहीम राबवण्यात येणार असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.  केंद्र सरकार खरेदी व पुरवठा करताना ७५ टक्के लशी यापुढील काळात मोफत देणार आहे.   भारतात ४०.६० कोटी लोकांचे लसीकरण झाले असल्याचे सोमवारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.