करोनारुपी राक्षसानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. करोनाच्या भीतीपोटी शाळा महाविद्यालयं बंद आहे. यासाठी अनेक देशांनी जनजीवन पूर्ववत करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. भारतात १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. तर दोन वर्षांपासून पुढील लहान मुलांवर ट्रायल सुरु आहे. अजूनही दोन वर्षांवरील मुलांचं लसीकरण करायचं की नाही? असा प्रश्न समोर असताना क्यूबा या देशानं दोन वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी क्यूबामध्ये १२ वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यात येत होतं. आता दोन वर्षांवरील मुलांना करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. क्यूबा जगातील पहिला देश आहे, जिथे दोन वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरु आहे.

सोमवारपासून दोन वर्षांपासून पुढील सर्वाचं लसीकरण केलं जात आहे.क्यूबामध्ये सद्यस्थितीत दोन करोना लस दिल्या जात आहे. यात अब्दला आणि सोबराना लसींचा समावेश आहे. लसीचं परीक्षण केल्यानंतर क्यूबा सरकारने परवानगी दिली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं या लसींना अद्याप परवानगी दिलेली नाही. या लसी क्युबामध्ये तयार केलेल्या आहेत. जवळपास १.१२ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात सरकार शाळा सुरु होण्यापूर्वी मुलांचं लसीकरण करणार आहे. क्यूबामध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा नसल्याने मुलांना टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकवलं जात आहे. यासाठी सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी मार्च २०२० मध्ये शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र करोना संक्रमण वेगाने होत असल्याने पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वर्गात शिट्टी वाजवल्याच्या कारणातून ४० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; १० मुलं गंभीर जखमी

अजूनही काही देश १२ वर्षांवरील अधिक वयाच्या मुलांवरील करोना लसीचा शोध घेत आहेत. काही देशांमध्ये परीक्षण सुरु आहे. तर चीन, संयुक्त अरब अमीरात आणि व्हेनेज्युलासारख्या देशांनी लहान मुलांना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र अजूनही लसीकरण मोहीम सुरु झालेली नाही. दुसरीकडे भारतातही १२ वर्षांवरील मुलांना लस देण्याची तयारी सुरु आहे. यासाठी सरकारने झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी दिली आहे. ही लस १२ वर्षांवरील मुलांना दिली जाऊ शकते, असे संकेत सरकारने दिले आहेत.