करोना व्हायरसपासून लोकांचे रक्षण करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत भारतात १०७ कोटीहून अधिक करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, विदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या आढावा बैठकीत उपस्थित होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “१०० वर्षांतील या सर्वात मोठ्या महामारीमध्ये देशाने अनेक आव्हानांचा सामना केला आहे. देशाच्या करोनाविरुद्धच्या लढ्यात एक खास गोष्ट म्हणजे आपण नवीन उपाय शोधले, नवनवीन मार्गांचा उपयोग केला. तुमच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन नाविन्यपूर्ण मार्गांवर अधिक काम करावे लागेल.  तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक शहरासाठी वेगळी रणनीती बनवायची असेल तर तीही बनवा. तुम्ही प्रदेशानुसार २०-२५ लोकांची टीम तयार करून देखील हे करू शकता.”

लोकांमध्ये अफवा आणि गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकांमध्ये अफवा आणि गोंधळ हे एक आव्हान आहे. यासाठी एक मोठा उपाय म्हणजे लोकांना अधिकाधिक जागरूक करणे. यामध्ये तुम्ही स्थानिक धर्मगुरूंची धेखील मदत घेऊ शकता. काही दिवसांपूर्वी मी पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली होती. लसीबाबत  धर्मगुरूंचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यावरही आपल्याला विशेष भर द्यावा लागेल.”

“आपण ‘सबको वैक्सीन, मुफ्त वैक्सीन’ मोहिमेअंतर्गत एका दिवसात सुमारे २.५ कोटी लसीचे डोस दिले आहेत. यातून आपली क्षमता काय आहे, आपले सामर्थ्य काय आहे हे दिसून येते.” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona vaccination pm narendra modi to talk 40 district magistrate srk