पीटीआय, नवी दिल्ली : जगभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. याला चालना देण्यासाठी नाकावाटे देण्यात येणाऱ्या पहिल्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे. ‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली असून कोणत्याही लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना वर्धक मात्रा म्हणून ही लस घेता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत बायोटेकने तयार केलेल्या ‘इन्कोव्हॅक’ किंवा ‘बीबीव्ही १५४’ लसीच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे. ‘को-विन’ संकेतस्थळ आणि अ‍ॅप्लिकेशनवर शुक्रवार संध्याकाळपासून या वर्धक मात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे. ही लस सुईचा वापर न करता नाकातून देण्यात येईल. ‘कोव्हिशील्ड’ किंवा ‘कोवॅक्सिन’च्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींना अधिक दक्षता म्हणून ही लस घेता येणार आहे. लस १८ वर्षांवरील व्यक्तींना वर्धक मात्रा म्हणून देण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) नोव्हेंबरमध्येच मंजुरी दिली होती. लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. आरोरा यांनी सांगितले की, नाकाद्वारे घेण्यात येणारी लस ही भारताच्या संशोधन आणि विकास कौशल्याचे आणखी एक यश आहे. ही लस घेणे अतिशय सोपे आहे. ‘इन्कोवॅक’ या लशीच्या तीन टप्प्यांत झालेल्या चाचण्या यशस्वी ठरल्याचे कंपनीने या अगोदरच स्पष्ट केले आहे.

विश्लेषण: आजपासून भारतात उपलब्ध होणार iNCOVACC नेजल व्हॅक्सिन; जाणून घ्या कोणाला घेता येणार ही लस, कुठे करावी नोंदणी

अधिक उपयुक्त का?

  • ही लस नाकातून देण्यात येत असल्यामुळे श्वसनसंस्थेच्या वरच्या भागात स्थानिक प्रतिजैविके तयार करण्याची तिची क्षमता असेल.
  • केवळ करोनाची लागणच नव्हे, तर प्रसार रोखण्यासाठीही या लशीची मदत होऊ शकेल, असे मानले जात आहे.
  • शिवाय सुईची गरज नसल्यामुळे लस घेणे सोपे आणि कमी त्रासाचे असेल. त्यामुळे इंजेक्शन आणि सुयांची टंचाई निर्माण होणार नाही.

खासगी रुग्णालयांतून सुरुवात

सध्या नाकातून घेण्याची ही लस केवळ खासगी रुग्णलयांमध्ये उपलब्ध असेल. ‘को-विन’ अ‍ॅप्लिकेशन किंवा संकेतस्थळावर याची नोंदणी करून ही वर्धक मात्रा घेता येईल. लवकरच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लशीचा समावेश केला जाईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona vaccine dose through the nose approval use of bharat biotech intranasal covid vaccine ysh