शिल्लक असलेल्या आणि वापरल्या न गेलेल्या मिळून करोना प्रतिबंधक लशींच्या १.८३ कोटींहून अधिक मात्रा राज्ये व खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना करोना लशीच्या ३७ कोटींहून अधिक (३७,९३,५६,७९०) मात्रा आतापर्यंत पुरवण्यात आल्या असून, आणखी २३ लाख ८० हजार मात्रा त्यांच्यापर्यंत पोहचण्याच्या बेतात आहेत. यापैकी वाया गेलेल्या लशी जमेला धरून एकूण वापर ३६,०९,६९,१२८ मात्रा इतका आहे, अशी माहिती मंत्रालयाने दिली. १.८३ कोटींहून अधिक (१,८३,८७,६६२) मात्रा अजूनही राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच खासगी रुग्णालयांकडे देण्यासाठी उपलब्ध आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले.
देशभरात लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यास केंद्र सरकार बांधील आहे. करोना लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा २१ जूनपासून सुरू झाला. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकार राज्यांना करोना प्रतिबंधक लशी मोफत पुरवून मदत करत आहे.
तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची सनोफी, जीएसकेला परवानगी
समायोजित पुनर्संचयित प्रोटिन कोविड-१९ लसघटकाची सुरक्षितता, परिणामकारकता व रोग प्रतिकारकक्षमता यांची भारतात तिसऱ्या टप्प्यातील नैदानिक चाचण्या करण्यासाठी सनोफी व जीएसके या कंपन्यांना परवानगी मिळाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील या जागतिक अभ्यासात अमेरिका, आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका येथील निरनिराळ्या ठिकाणच्या १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ३५ हजारांहून अधिक स्वयंसेवकांचा समावेश असेल, असे सनोफीने गुरुवारी एका निवेदनात सांगितले.