करोना प्रतिबंधक मोहिमेची वर्षपूर्ती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कालावधीत देशभरात लशीच्या १५६.७६ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी ९३ टक्क्यांहून अधिक लोकांना करोना प्रतिबंधक लशीची किमान पहिली मात्रा मिळाली असून, ६९.८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त, स्वदेशात निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ या लशीवर एक टपाल तिकीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी जारी केले.

 १० कोटी लसमात्रा देण्याचा टप्पा भारताने गेल्या वर्षी १ एप्रिलला गाठला. २५ जून रोजी २५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या. ६ ऑगस्टला ५० कोटी, तर १३ सप्टेंबरला ७५ कोटी लसमात्रांचा टप्पा गाठण्यात आला, असे मांडविया यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले.

 गेल्या वर्षी २१ ऑक्टोबरला देशातील लसीकरणाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला. या वर्षी ७ जानेवारीला लसमात्रांची १५० कोटींची संख्या ओलांडली गेली.

  गेल्या वर्षी १६ जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. २ फेब्रुवारीपासून करोनायोद्ध्यांचे लसीकरण सुरू झाले. यापुढील टप्पा १ मार्चला सुरू होऊन, ६० वर्षांहून अधिक वयाचे लोक, तसेच सहव्याधी असलेले ४५ वर्षांहून अधिक वयाचे लोक यांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला.

 १ एप्रिलपासून ४५ वर्षांहून अधिक वयाच्या सर्वच लोकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. त्यानंतर १ मे पासून १८ वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येकाच्या लसीकरणाची मुभा देऊन लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. १५ ते १८ वर्षांदरम्यानच्या किशोरवयीन मुलांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरणाचा पुढील टप्पा या वर्षी ३ जानेवारीपासून सुरू झालेला आहे.

करोनाच्या ओमायक्रॉन या प्रकाराचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने, आरोग्य कर्मचारी व करोनायोद्धे यांना करोना लशीची मात्रा देण्यास सरकारने १० जानेवारीपासून सुरुवात केली आहे. यात निवडणूक होत असलेल्या ५ राज्यांत तैनात करण्यात आलेले मतदान कर्मचारी, तसेच सहव्याधी असलेले ६० वर्षांहून अधिक वयाचे लोक यांचाही समावेश आहे.

 ताज्या टप्प्यात, वर्धक लशींच्या ४३.१९ पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, १५-१८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लशीच्या ३,३८,५०,९१२ पहिल्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

 लसीकरणास पात्र लोकांची बरीच कमी संख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चिमात्य देशांशी तुलना करता, भारताचा लसीकरण कार्यक्रम हा सर्वाधिक यशस्वी आणि सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

मोहिमेतील उल्लेखनीय टप्पे

’ ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १०० कोटी लसमात्रा

’ एकाच दिवसात २.५१ कोटी लसमात्रा

’ अनेक वेळा एकाच दिवसात १ कोटी लसमात्रा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient corona vaccination akp 94