नवी दिल्ली : देशात जून महिन्यात करोनाच्या रोज १८ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४० कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने  दिली आहे.

भारतात ४० कोटी १८ लाख ११ हजार ८९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात १ जून २०२१ पर्यंत ३५ कोटी चाचण्या झाल्या होत्या. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने म्हटले आहे, की चाचण्यांच्या पायाभूत सुविधा व क्षमता वाढवण्यात आल्याने हे शक्य झाले आहे. देशभरात चाचण्या करण्यात येत असून त्यात अभिनव पद्धतीचे चाचणी संच वापरण्यात येत आहेत. संस्थेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले, की चाचण्या जास्त होत असल्याने मृत्यूचा दर घटण्य़ास मदत होत आहे.

टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट, यूज ऑफ टेक्नॉलॉजी हा ‘फाईव्ह टी’ दृष्टिकोन राबवण्यात आल्याने करोनाला नियंत्रणात ठेवता येऊ शकते, असे भार्गव यांनी म्हटले आहे.