डेल्टासह सर्व प्रकारांवर उपयुक्त; अभ्यासकांची ग्वाही
करोना प्रतिबंधासाठी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या लशी सार्स सीओव्ही म्हणजे कोविड १९ विषाणूला प्रतिबंध करतात, असे अमेरिकेतील एका अभ्यासात दिसून आले आहे.
राष्ट्रीय माहिती संचाच्या आधारे करण्यात आलेल्या तुलनेत असे दिसून आले की, मॉडर्नाची लस ही फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लशींपेक्षा करोनाच्या डेल्टा उपप्रकारावर जास्त प्रभावी आहे. वास्तव माहितीच्या आधारे विचार केला असता या लशींमुळे करोना झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता कमी झाली. त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करावे लागले नाही. विशेष करून डेल्टाच्या संदर्भात ज्यांना मॉडर्ना लस दिली होती त्यांच्यात परिणामकारकता ज्यांना फायझर व जॉन्सन अँड जॉन्सनची लस दिली होती त्यांच्यापेक्षा अधिक होती, असे रिजेनस्ट्रीफ इन्स्टिट्यूटच्या डेटा अँड अॅनॅलेटिक्स विभागाचे उपाध्यक्ष शौन ग्रॅनीस यांनी म्हटले आहे.
ग्रॅनीस यांनी सांगितले की, गंभीर आजारपण टाळण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी लशींचा वापर करण्याची गरज आहे. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यातील डेल्टा विषाणू प्रकाराची माहिती घेतली असता नऊ राज्यांतील ३२ हजार व्यक्तींच्या करोना संसर्गाचे विश्लेषण व्हिजन नेटवर्कने केले होते. त्यात ज्यांचे लसीकरण करण्यात आले नव्हते त्यांच्या तुलनेत लसीकरण करण्यात आलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण ५ ते ७ पटींनी कमी होते. आधीच्या विषाणू प्रकारांवर ही लस जितकी परिणामकारक होती तितकीच डेल्टा विषाणूतही परिणामकारक दिसून आली.
‘मॉरर्बिडिटी अँड मोरटॅलिटी विकली रिपोर्ट’मध्ये म्हटले आहे की, एमआरएनए लशी जास्त परिणामकारक सिद्ध झाल्या आहेत. १८ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये मॉडर्नाची लस रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करण्यात ९५ टक्के प्रभावी ठरली, तर फायझरची लस ८० टक्के आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लस ६० टक्के प्रभावी दिसून आली आहे. ७५ वर्षे व त्यावरील व्यक्तींसाठी लशीची परिणामकारकता कमी दिसून आली. आपत्कालीन विभागात दाखल करण्याबाबत मॉडर्ना लस ९२ टक्के, फायझर ७७ टक्के तर जॉन्सन अँड जॉन्सन लस ६५ टक्के प्रभावी ठरली आहे. परिणामकारकतेत फरक असला तरी या सर्वच लशींमुळे करोनापासून संरक्षण मिळते, असे ग्रॅनिस यांनी म्हटले आहे.