३.८६ कोटी नागरिकांना कालमर्यादेत लाभ न मिळाल्याची सरकारची कबुली
देशातील ३.८६ कोटी नागरिकांना लशीची दुसरी मात्रा निर्धारित कालावधीत मिळाली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. लसटंचाईमुळे लसीकरण मोहीम मंदावल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.
करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या लसमात्रेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते रमण शर्मा यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार याबाबत अर्ज केला होता. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या किती नागरिकांना दुसरी मात्रा निर्धारित कालमर्यादेत मिळाली नाही, याची आकडेवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागितली होती. त्यास आरोग्य मंत्रालयाच्या करोना लस प्रशासन पथकाने उत्तर दिले.
कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर ८४ ते ११२ दिवसांत दुसरी मात्रा, तर कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर २८-४२ दिवसांत दुसरी मात्रा घ्यावी, अशी कालमर्यादा सरकारने निश्चित केली आहे. मात्र, १७ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३,४०,७२,९९३ नागरिकांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा निर्धारित कालमर्यादेत मिळाली नाही. तसेच कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या ४६,७८,४०६ नागरिकांना दुसरी मात्रा निर्धारित कालमर्यादेत मिळाली नाही, अशी कबुली सरकारने दिली आहे.
करोना प्रतिबंधक लशीच्या संपूर्ण लाभासाठी दोन मात्रा घेणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. संमिश्र लशी फायदेशीर असल्याचे संशोधानातून स्पष्ट झाले असले तरी याबाबत अद्याप सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. लसलाभार्थींनी एकाच कंपनीच्या (कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन) दोन लसमात्रा घ्याव्यात, अशी सरकारची सूचना आहे. मात्र, लसतुटवड्यामुळे दुसरी लसमात्रा मिळवताना लाभार्थींना कसरत करावी लागत असल्याचे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
लसीकरण असे…
’देशात जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत (१९ आगॅस्ट रात्रीपर्यंत)५७.१२ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
’देशातील ४४,४६,५७,३०५ नागरिकांना पहिली लसमात्रा मिळाली असून, १२,६५,५०२७८ नागरिकांना दुसरीही मात्रा मिळाली आहे.
’कोविन पोर्टलवरील आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी (१९ ऑगस्ट) ५३,१३,२२१ नागरिकांचे लसीकरण झाले.
’देशभरात मंगळवारी (१७ ऑगस्ट) ५७,०९३९५ आणि बुधवारी (१८ ऑगस्ट) ५६,१५,६७१ नागरिकांचे लसीकरण झाले.
’देशातील सर्व नागरिकांचे वर्षअखेरपर्यंत लसीकरण
पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, या उद्दिष्टपूर्तीसाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.
देशातील निम्मे लसीकरणाच्या संथगतीमुळे विकासदर घटण्याचा अंदाज
भारतात लसीकरण संथगतीने सुरू असल्याने ‘फिच’ने अंदाजित विकासदर घटवला आहे. देशात २०२१-२२ या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर ९.६ टक्के असेल, असा अंदाज ‘फिच’ने वर्तवला होता. मात्र, संथ लसीकरणाच्या पाश्र्वाभूमीवर विकासदर ९.४ टक्के असेल, असा सुधारित अंदाज वर्तविण्यात आला आहे. आरोग्यावरील खर्चात वाढ, बचतींमधील घट आणि महागाई हे घटक विकासदरास मारक ठरतील, असे ‘फिच’ने म्हटले आहे.
नवे रुग्ण केरळमध्ये
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी केरळमधील रुग्णवाढ ही चिंतेची बाब ठरली आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३६,४०१ नवे रुग्ण आढळले, तर ५३० रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात केरळमध्ये २१,११६ रुग्ण आढळले. देशातील करोनाबळींची एकूण संख्या ४,३३,०४९ वर पोहोचली आहे. देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ९७.५२ टक्के आहे.