देशातील करोना लस प्रशासन अधिक कार्यक्षम बनले असून जुलै अखेर एकूण १३.४५ कोटी मात्रा देण्यात आल्या. महिन्यात दिवसाला ४३.४१ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी सांगितले. शुक्रवारपर्यंत देशात एकूण करोना लशींच्या ५० कोटी मात्रा देण्यात आल्या असून करोना विरोधातील लढा तीव्र करण्यात आला आहे.

‘सबको व्हॅक्सीन मुफ्त व्हॅक्सीन’ हॅशटॅगवर त्यांनी म्हटले आहे की, लसीकरण वाढत असून जुलैत १३.४५ कोटी मात्रा देण्यात आल्या असून जुलै अखेर दिवसाला १३.४५ कोटी मात्रा इतके प्रमाण होते. भारतात ५० कोटी १० लाख ९ हजार ६०९ लस मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या असून त्यासाठी ५८,०८,३४४ लस सत्रांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या २४ तासांत ४९ लाख ५५ हजार १३८ मात्रा देण्यात आल्या. केंद्र सरकारने लसीकरणाचा वेग व व्याप्ती वाढवली असून दैनंदिन प्रमाणही वाढत आहे असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

दिवसभरात ३८,६२८ रुग्ण

गेल्या २४ तासांत देशात आणखी ३८,६२८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३,१८,९५,३८५ वर पोहचली. याच काळात ६१७ जणांचे करोनाने बळी घेतल्याने करोनामृत्यूचा आकडा ४,२७,३७१ इतका झाला आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या  ४,१२,१५३ इतकी कमी झाली असून, ही संख्या एकूण रुग्णांच्या १.२९ टक्के आहे. आतापर्यंत ३,१०,५५,८६१ लोक बरे झाले असून हे प्रमाण ९७.३७ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ५०.१० कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या ६१७ जणांमध्ये महाराष्ट्र व केरळमधील प्रत्येकी १८७ जण आहेत.

‘अमेरिकेने भारताला आणखी लसपुरवठा करावा’

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला केवळ ७५ लाख लसमात्रा दिल्या असून जागतिक लस मदत कार्यक्रमात आणखी मात्रा देण्याची गरज आहे, असे अमेरिकी काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे. जग नव्या लसरोधक विषाणू प्रकारास तोंड देत असताना आणखी लशी देणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.  कृष्णमूर्ती यांना अमेरिकी काँग्रेसमधील ११६ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. भारतच नव्हे तर इतर गरीब देशांनाही लस पुरवठा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

अध्यक्ष जो बायडेन व काँग्रेसमधील माझे सहकारी ‘नोव्हिड’ कायद्याच्या संमतीसाठी एकत्र आले हे चांगलेच झाले, त्यामुळे जगभरातील करोना विरोधातील लढाईला बळ मिळणार आहे.  भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ आला असून कोविड पासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर जागतिक भागीदारीची गरज आहे. हे काम लशींच्या माध्यमातूनच करता येऊ शकते असे कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगातील लोकशाही देश सहकार्य करीत आहेत. अमेरिका व भारत यांच्यात लस सहकार्य आहे. करोनाच्या जागतिक साथीला कसा प्रतिसाद द्यायचा यासाठी नोव्हिड कायदा करण्यात आला असून त्याचे विधेयक राजा कृष्णमूर्ती, सेनेटर जेफ मर्कले, एलिझाबेथ वॉरेन यांनी मांडले होते. त्यात प्रमिला जयपाल यांचाही समावेश होता. यात अमेरिकी आंतरराष्ट्रीय विकास संस्था , सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन , अन्न व औषध प्रशासन अशा संस्था सहभागी होत आहेत.

Story img Loader