जागतिक आरोग्य संघटनेला चिंता
कोविड १९ चा डेल्टा विषाणू हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा विषाणू ठरला आहे. लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा विषाणू अधिक वेगाने पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले.
घेब्रेसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की जगात सध्या सर्वात जास्त चिंता डेल्टा विषाणूबाबत आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाही या विषाणूच्या धोक्याची काळजी वाटत आहे. डेल्टा विषाणू पहिल्यांदा भारतात सापडला होता.
जीनिव्हा येथे त्यांनी सांगितले, की डेल्टा हा करोना विषाणूच्या आतापर्यंतच्या सर्व उपप्रकारांत सर्वात वेगाने पसरणारा विषाणू असून तो लस न घेतलेल्यांना धोकादायक ठरत आहे. काही देशांनी सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाययोजना यात ढिलाई दाखवली आहे. त्यामुळे जगात हा विषाणू वेगाने पसरत आहे. जेवढे जास्त रुग्ण तेवढे ते रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत असते हे येथे ध्यानात घेतले पाहिजे, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण येऊ शकतो. रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर मृत्यूचा धोका वाढत आहे. त्यामुळे आधीच्या टप्प्यातच या विषाणूचा संसर्ग रोखता आला पाहिजे. कोविड १९ विषाणूचे अनेक उपप्रकार येऊ शकतात. ते येत राहतील, ते उत्क्रांत होतील. प्रसार रोखणे हाच त्यावरचा उपाय आहे.
कोविड तांत्रिक गटाच्या प्रमुख डॉ. मारिया व्हॅन केरखोव यांनी कठोर इशारा देताना सांगितले, की डेल्टा विषाणू घातक आहे. अल्फा विषाणूपेक्षा तो वेगाने पसरत असून जास्त संसर्गजन्य आहे. अनेक युरोपीय देशांत रुग्णसंख्या कमी झाली आहे. क्रीडा व धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. गर्दी होणारे हे कार्यक्रम टाळले पाहिजेत, कारण त्यामुळे विषाणूचा प्रसार होत आहे.
काही देशांत लसीकरण जास्त झाले आहे, पण काही देशात ते कमी आहे. तेथे या विषाणूचा धोका अधिक आहे.
मध्य प्रदेशात डेल्टा प्लसचे आठ रुग्ण
भोपाळ : मध्य प्रदेशात डेल्टा प्लस या करोना विषाणूचे आठ रुग्ण सापडले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वाास सारंग यांनी दिली. या रुग्णांच्या संपर्कातील कुणाही व्यक्तींना संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात मरण पावलेले दोन जण हे डेल्टा प्लस विषाणूने बाधित होते. सारंग यांनी सांगितले की, डेल्टा प्लस विषाणू चाचण्या नियमानुसार केल्या जात असून नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल नियमितपणे माहिती देत आहे.
डेल्टा प्लस विषाणूने तमिळनाडूत एकाचा मृत्यू
चेन्नई : डेल्टा प्लस विषाणूने मदुराई येथे तमिळनाडू राज्यातील पहिला बळी घेतला असून आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती जारी केली आहे. वैद्यकीय व कुटुंब कल्याण मंत्री मा सुब्रमणियन यांनी सांगितले,की नवीन डेल्टा प्लस विषाणूचे तीन रुग्ण सापडले होते, त्यातील दोन बरे झाले. मदुराई येथील रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याचे नमुने घेण्यात आले होते.