नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ तसेच अन्य राज्यांत करोनाचे रुग्ण वाढू लागले असून गणेशोत्सव, नवरात्र या सणासुदीच्या दिवसांत करोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन निती आयोगाचे सदस्य व करोना कृती गटाचे प्रमुख व्ही.के. पॉल यांनी गुरुवारी केले. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे ही पूर्वअट आहे, असेही केंद्राने स्पष्ट केले.

सणासुदीचे दिवस आणि बदलणारे हवामान या दोन्हींमुळे लोकांना साथींचा त्रास होऊ शकतो. रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात असली तरी ती वाढू नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करू नका, सण व उत्सव घरात राहून साजरे करा. करोनाचा विषाणू उत्परिवर्तन होत आहे. या प्रक्रियेवर कोणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे गेल्या वर्षी जसा संयम दाखवला तसा याही वर्षी दाखवावा, असे आवाहन पॉल यांनी केले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)चे महासंचालक बलराम भार्गव यांच्या म्हणण्यानुसार देशात अजूनही करोनाची दुसरी लाट सुरू असून निर्बंध पाळावेच लागतील.

लसींच्या दोन्ही मात्रा घेण्याची गरज असून अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला पाहिजे. शहरांमध्ये लसीकरण होत असून दुर्गम भागात लसीकरण झाले पाहिजे, त्यावर केंद्र सरकार भर देत आहे, असे पॉल यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून गरजेनुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली होती. तसेच केंद्रीय आरोग्य विभागानेही राज्यांना सणासुदीच्या दिवसांत निर्बंध लागू करण्याची सूचना केली होती.

देशभर लसीकरणावर भर दिला जात असला तरी सणासुदीच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्यासच सार्वजनिक समारंभात सहभागी व्हा.  – व्ही. के. पॉल, करोना कृती गटाचे प्रमुख