८५ टक्के संरक्षणाचा कंपनीचा दावा

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या करोना प्रतिबंधक एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी दिली.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लशीला परवानगी देण्यात आल्याने करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला बळ मिळेल, असे मंडाविया यांनी सांगितले. जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकी औषध उत्पादक कंपनी आहे.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रेच्या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून आता आपत्कालीन वापरासाठी भारतात पाच लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या करोनाविरोधी लढाईला चालना मिळेल, असे आरोग्यमंत्री मंडाविया यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. तर लस वापरास परवानगी मिळाल्याने करोनाची साथ संपवण्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे.

भारत सरकारने ७ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या एक मात्रेच्या लशीस आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते. ही लस डेल्टासह, करोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून संरक्षण देते. तिची परिणामकारकता ८५ टक्के आहे. सर्व भागांमध्ये तिच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून तसेच मृत्यूपासूनही ती संरक्षण करते, असा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने केला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने ५ ऑगस्टला एक मात्रा लशीला आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.

भारतातील उपलब्ध लशी

आतापर्यंत आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित अ‍ॅस्ट्राझेनेका- कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक, मॉडर्ना आणि आता जॉन्सन अँड जॉन्सन या लशींना परवानगी देण्यात आली आहे.

राज्यांकडे २ कोटी २९ लाख लसमात्रा शिल्लक

नवी दिल्ली : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे दोन कोटी २९ लाख लसमात्रा शिल्लक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ५१ कोटी ६६ लाख (५१,६६,१३,६८०) लसमात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे, तर त्यांना आणखी ५५ लाख ५२ हजार ७० लसमात्रा लवकरच देण्यात येतील. शनिवारपर्यंत वाया गेलेल्या लसमात्रांसह ४९ कोटी ७४ लाख ९० हजार ८१५ मात्रांचा वापर करण्यात आल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

परिणामकारकता किती?

’वैद्यकीय चाचण्यांत ही लस ८५ टक्के परिणामकारक ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.

’ डेल्टा विषाणूपासूनही संरक्षण मिळते, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

’संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून संरक्षण देते, असाही कंपनीचा दावा आहे.

’‘बायॉलॉजिकल ई’ ही कंपनी या लशीचे भारतात उत्पादन करणार आहे.

’या लशीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.

Story img Loader