उत्तराखंडची राजधानी असणाऱ्या डेहराडूनमधील एका १५ वर्षाच्या मुलाने करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं आहे. दहावी इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाने पंतप्रधानांकडे या पत्राद्वारे एक मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेहरादूनमधील सेंट जोसेफ अकॅडमीमध्ये दहावीला असणाऱ्या अभिनव कुमार शर्मा असं या मुलाचं नाव आहे. अभिनवने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या पत्रामध्ये लॉकडाउनमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘जगभरामध्ये करोनाची साथ पसरली आहे. जगातील १८० हून अधिक देशांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. भारतामध्ये करोनाचा अधिक संसर्ग होऊ नये लोकांनी सोशल डिस्टंन्सींगचा अवलंब करावा म्हणून २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाउनच्या घोषणेनंतर कामगारांचे स्थलांतर हा नवा प्रश्न भारतासमोर निर्माण झाला आहे. एक विकसनशील देश असणारा भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असल्याने अंत्यंत काळजीपूर्वकपणे करोनाचे संकटाला तोंड देणे गरजेचे आहे. हातावर पोट असणारे हजारो कामगार, गरीब, बेघर, आपल्या राज्यांमध्ये पायीच निघालेले रोजंदारी करणारे कामगार अशा अनेकांकडे दोन वेळेच्या खाण्याची पुरेशी सोय नाही. त्यातच करोनाचा धोका पाहता लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला तर या लोकांचे काय होणार?,’ अशा शब्दांमध्ये अभिनवने लॉकडाउनसंदर्भातील चिंता व्यक्त केली आहे.

देशातील सध्याची परिस्थिती पाहता देशातील सर्व धर्मांच्या सर्व धार्मिक ट्रस्टला त्यांच्याकडे असणाऱ्या देवाच्या संपत्तीमधील ८० टक्के संपत्ती पंतप्रधान केअर्स या मदतनिधीच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी द्यावेत अशी मागणी अभिनवने पत्रामधून केली आहे. या पैशांचा वापरत करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान गरजू व्यक्तींना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी करता येईल असा सल्लाही अभिनवने दिले आहे. “देवाकडील पैश्यांनी देवाची मुले वाचवणार असतील तर तो आपल्याला आशिर्वादच देईल याची मला खात्री आहे. आपला माणूसकीवरील विश्वास आणखीन दृढ होईल,” अशी अपेक्षा अभिनवने आपल्या पत्रामधून व्यक्त केली आहे.

चीनमध्ये करोनाचा प्रसार झाला तेव्हापासून आपण या करोनाच्या साथीवर लक्ष ठेऊन असल्याचेही अभिनवने या पत्रामध्ये म्हटलं आहे. “देवाच्या कृपेने माझे आई-वडील दोघेही आरोग्य क्षेत्राशी संबंधित काम करतात. ते रोज रुग्णालयात जातात. घरी आल्यावर मला करोनासंदर्भातील अनेक गोष्टी सांगतात आणि रुग्णलयातील परिस्थितीबद्दल बोलतात. सध्या सोशल डिस्टन्सिंगच आपल्याला वाचवू शकते असं आपले पंतप्रधान सांगतात. लॉकडाउनचा कालावधी वाढेल अशी माझी अपेक्षा आहे. मात्र असं होणार असेल तर त्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवं, ज्यामुळे कोणालाही त्याचा फटका बसणार नाही,” असं अभिनव पत्रात म्हणतो.

अभिनवने आपले हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना इमेल केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 15 year old asks pm modi to order all religious trusts to donate 80 percent of gods wealth to fight covid 19 scsg