स्वसंरक्षण ड्रेस खरेदी करण्यासाठी देण्यात आलेला ५० लाखांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या PM Cares फंडाकडे वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिल्लीमधील एम्स रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने हा आरोप करण्यात आला आहे. आरोपानुसार, भारत डायनॅमिक्सकडून देण्यात आलेला ५० लाखांचा निधी रुग्णालय प्रशासन आणि सीएसआर विभागाकडून मोदींच्या PM Cares फंडाकडे वळवण्यात आला आहे. या पैशांमधून स्वसंरक्षण ड्रेसची खरेदी करणं अपेक्षित होतं. मात्र एम्स रुग्णालयाने हा आरोप फेटाळला असून आपल्याला निधीच मिळाला नसल्याचं म्हटलं आहे.
यावेळी संघटनेने आरोप करताना डॉक्टरांनी लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचण्याचा आदेश असतानाही वसतिगृह अधीक्षकांकडून प्रवासासाठी कोणतीही सोय अद्याप करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. “आम्ही बुधवारी प्रशासनाची भेट घेऊन आमची काळजी व्यक्त केली. आरोग्य मंत्रालयाने आदेश दिल्याप्रमाणे स्वसंरक्षण ड्रेसचा दर्जा चांगला असावा अशी विनंती आम्ही त्यांना यावेळी केली. ज्यामुळे डॉक्टर तसंच इतर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊन करोनाची लागण होण्याची भीती राहणार नाही. जुगाड केलेले स्वसंक्षण ड्रेस चालणार नाहीत,” असं संघटनेच्या सचिव श्रीनिवास राजकुमार यांनी सांगितलं आहे.
यावेली त्यांनी निधी वळवणं गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. आरोपांना उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने हे सर्व निराधार असल्याचं म्हटलं आहे. रुग्णालय प्रशासनाने आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे की, “भारत डायनॅमिक्सकडून एम्सला कोणताही निधी देण्यात आलेला नाही. निवासी डॉक्टर संघटनेने भारत डायनॅमिक्स स्वसंरक्षण ड्रेसची खरेदी कऱण्यासाठी निधी देण्यास उत्सुक असल्याची माहिती दिली होती. पण त्यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतरही अद्याप निधी मिळालेला नाही”.
एम्स रुग्णालय सध्या १५० करोना रुग्णांची देखभाल करत असून त्यांची आणि आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा राखण्यास बांधील असल्याचंही प्रशासनाने सांगितलं आहे. निवासी डॉक्टर संघटनेने केंद्र सरकारला हैदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याबाबत पत्र लिहिलं आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण होत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.