संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) राजघराण्याच्या सदस्या आणि राजकन्या हेंद अल कासिमी (Princess Hend Al Qassimi) यांनी करोनाशी संबंधित घटनांचा आधार घेत भारतामध्ये इस्लामसंदर्भात द्वेष का निर्माण केला जात आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. मागील अनेक दिवसांपासून कासिमी यासंदर्भात ट्विटरवरुन व्यक्त होत आहेत. दुबईमध्ये राहणारे भारतीयही अशा प्रकारांमधून इस्लामद्वेष व्यक्त करत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही कासिमी यांनी नुकताच दिला होता. आता त्यांनी भारतामध्ये मुस्लीमांना अस्पृश्य समजलं जात आहे का असा सवाल उपस्थित केला आहे.

कासिमी यांनी सोमवारी (५ मे २०२० रोजी) काही ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी भारतात होणाऱ्या मुस्लीम तसेच इस्लामविरोधी घटनांवरुन थेट भारतामध्ये मुस्लीमांना अस्पृश्य समजलं जात आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. “भारतामध्ये मुस्लीमांकडे अस्पृश्य म्हणून पाहिलं जात आहेत का?” असे ट्विट कासिमी यांनी केलं आहे.

या विषयासंदर्भात त्यांनी एकूण चार ट्विट केले आहेत. एक ट्विटमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी सांगितलेली भारताची व्याख्या कासिमी यांनी मांडली आहे.

त्याआधी त्यांनी मी भारत हा आपला मित्र देश असल्याचे ट्विट केलं आहे.

मात्र हे ट्विट करण्याआधीच त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सुरु असणाऱ्या इस्लामद्वेषाच्या घटनांचा आढावा घेणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये अगदी भाजपाच्या खासदारांनी केलेल्या वक्तव्यांपासून ते तबलिगी जमातसंदर्भातील बातम्यांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कासिमी यांनी दुबईस्थित भारतीयाने केलेल्या मुस्लीमद्वेषी ट्विटचे स्क्रीनशॉट पोस्ट करत याप्रकारचा द्वेष खपवून घेतला जाणार नाही असा इशाराच दिला होता. “द्वेष पसरवणारी आणि दुजाभाव करणारी टीका करणाऱ्याला दंड केला जाईल आणि त्याला हाकलवून लावण्यात येईल. हे पाहा एक उदाहरण,” असं म्हणत कासिमी यांनी काही स्क्रीनशॉर्ट शेअर केले होते.

अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी सत्ताधारी पक्ष हा भारताचा मित्र असल्याचा संदर्भ दिला होता. “सध्याचे युएईचे सत्ताधारी हे भारताचे चांगले मित्र आहेत. मात्र राजघराण्यातील व्यक्ती म्हणून तुमचे हे उद्धट बोलणे खपवून घेणार नाही. येथे सर्व कामगारांना कामाचा मोबदला दिला जातो, कोणीही फुकट काम करण्यासाठी इथे येत नाही. तुम्ही ज्या देशात येऊन तुमची उपजीविका कमावता त्याचा तुम्ही द्वेष करता. याची दखल घेतली जाणार नाही असं होणार नाही,” असा इशाराही कासिमी यांनी दिला होता.

धर्मावर आधारित द्वेष पसरवणारी वक्तव्य करणाऱ्यांवर भारत सरकारने कारवाई करावी अशी मी विनंती करते, असं ट्विट त्यांनी ३० एप्रिल रोजी केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना व्हाइट हाऊसने अनफॉलो केल्याचे सांगत त्यांनी द्वेष पसरवणारी भाषणे थांबवा, असा हॅशटॅग वापरुन कासिमी यांनी ट्विट केलं होतं.

एकदंरितच कासिमी यांनी भारतामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या घटनांवर आक्षेप नोंदवत सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Story img Loader