देशभरामध्ये करोनामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हवा आणि स्पर्शामधून संसर्ग होणाऱ्या करोनाच्या विषाणूमुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सलाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या सर्वांमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याने केलेल्या चुकीमुळे त्याला १४ दिवस घरीच विलगीकरणामध्ये रहावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड काँग्रेसचे उपाध्यक्ष सुर्यकांत धसमाना यांनी देहरादून रुग्णालयामध्ये करोना संशयिताची भेट घेतली. त्यामुळेच आता सुर्यकांत यांना १४ दिवस त्यांच्या घरीच विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती देहरादूनचे जिल्हाधिकारी आशिष कुमार यांनी दिली आहे. देहरादून येथील रुग्णालयामध्ये तयार करण्यात आलेल्या करोना संशयितांच्या कक्षामध्ये जाऊन सूर्यकांत यांनी रुग्णांची चौकशी केली. मात्र यामुळे सुर्यकांत यांनाच आता १४ दिवस विलगीकरणामध्ये रहावे लागणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

उत्तराखंडमध्ये करोनाचा एक रुग्ण सापडला असून त्याच्यावर देहरादून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय परदेशातून आलेल्या काही संशयितांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामधील विशेष कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या १२६ पर्यंत पोहचली असून त्यापैकी १०४ भारतीय आहेत तर २२ परदेशी नागरिक आहेत. १३ जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus congress leader suryakant dhasmana in quarantine scsg