करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. पहिल्या लाटेत इतर देशांच्या मदतीला धावणाऱ्या भारताला सध्या मात्र इतर देशांच्या मदतीची गरज भासत आहे. यादरम्यान अमेरिकेच्या गरजा भागल्याशिवाय कुठलीही मदत देता येणार नाही अशी भूमिका अमेरिकेने लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याबाबतच्या मागणीवर घेतली होती. मात्र भारतीय अमेरिकी लोकांच्या वाढत्या दबावानंतर अमेरिकेनेही सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी ट्विट केलं असून, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे” असं म्हटलं आहे.

जो बायडन भारतातील स्थितीचा वारंवार आढावा घेत आहेत. यादरम्यान कमला हॅरिस यांनीदेखील ट्विट केलं आहे. “करोनाच्या संकटात भारताला वेगाने अतिरिक्त मदत आणि पुरवठा करण्यासाठी अमेरिकन सरकार भारतीय सरकारसोबत संपर्कात आहे. मदत करत असताना आम्ही धाडसी आरोग्य कर्मचाऱ्यांसहित सर्व भारतीय नागरिकांसाठी प्रार्थना करत आहोत,” असं कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाकरुन भारताला मदत करण्यासंबंधी पहिल्यांदाच अधिकृत वक्तव्य आलं आहे. आपला सहकारी भारताला मदत देण्यास उशीर करत असल्याने भारतीय अमेरिकी तसंच पक्षातील काही सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अमेरिकेकडून भारताला व्हेटिलेटर्स, पीपीई, लसीसाठी कच्चा माल तसंच अनेक गोष्टींचा पुरवठा केला जाणार आहे.

करोना लसीच्या निर्मितीसाठी कच्चा माल पुरवणार
अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली.

लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.

जगभरातून मदतीचा हात
भारताला मदत करण्याची तयारी दर्शवणाऱ्यात फ्रान्स, युरोपीय समुदाय व ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. भारतीय लोकांच्या आम्ही पाठीशी आहोत, हा देश कोविडची दुसरी लाट झेलत असताना या लढ्यात भारताला आमचा पाठिंबा आहे असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, युरोपीय समुदाय एकजुटीने भारतीय लोकांच्या पाठीशी आहे. ही केवळ भारताची एकट्याची लढाई नसून संयुक्त लढाई आहे. ८ मे रोजी भारत व युरोपीय समुदायाची बैठक होत असून त्यावेळी यावर चर्चा होईलच पण त्याआधी आम्ही मदत देण्यासही तयार आहोत.

चीनचे परराष्ट्र मंत्री झाओ लिजियान यांनी सांगितले की, आम्ही भारताशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतातील परिस्थितीबाबत सहवेदना व्यक्त केली असून या आव्हानाशी जागतिक पातळीवर सामना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

सिंगापूरने चार क्रायोजेनिक प्राणवायू टाक्या पाठवल्या असून संयुक्त अरब अमिरातीही भारतीय दूतावासाच्या मदतीने प्राणवायूच्या टाक्या पाठवण्याच्या विचारात आहे. युरोपीय समुदाय व रशिया यांनी प्राणवायू संबंधित व इतर औषधांची मदत भारताला देण्याचे ठरवले आहे.

स्वीडिश हवामान कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिने म्हटले आहे की, जागतिक समुदायाने ताबडतोब पुढे येऊन भारताला मदत करावी.

सौदी अरेबियाकडून प्राणवायूपुरवठा
सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन प्राणवायू भारताला पाठवला असून अदानी समूह व लिंडे कंपनी यांच्या सहकार्यातून हा प्राणवायू भारतात येणार आहे. रियाध येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, अदानी समूह व मे. लिंडे कंपनी यांच्या मदतीने प्राणवायू भारतात पाठवण्यात येत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, ८० मेट्रिक टन प्राणवायू क्रायोजेनिक टँकरमध्ये भरून भारतात आणला जात आहे. दम्मम ते मुंद्रा या मार्गाने या टँकरचा प्रवास सुरू आहे. रियाधमधील भारतीय दूतावासाचे आम्ही आभारी आहोत.

ऑस्ट्रेलियाचा कृतज्ञताभाव
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिसे पायने यांनीही भारताबाबत सहवेदना व्यक्त केली असून भारताने आम्हाला लशी पुरवून मोठे औदार्य दाखवले होते, आता भारतात दुसरी लाट आली असताना आम्ही त्या देशाला मदत करण्यास तयार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader