मुंबई विमानतळावर आरोग्य विभागानं हातावर मारलेला होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून मुंबई-लखनऊ रेल्वे प्रवास करणाऱ्या मायलेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली असून, त्यांच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्याचं काम हाती घेतलं आहे.
करोनाचा उद्रेक झाल्यानंतर मक्केला गेलेला ३७ जणांचा जत्था मायदेशी परतला होता. मुंबई विमानतळावर उतरलेल्या या ३७ जणांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. मात्र, त्यांनी विमानतळ सोडल्यानंतर होम क्वारंटाइनचा शिक्का मिटवला. त्याचबरोबर मुंबईहून लखनऊला विमानानं गेलो तर पकडले जाऊ, या भीतीनं रेल्वेनं प्रवास करण्याचं ठरवलं. १९ मार्चला हे सर्व घरी पोहोचले. यात हरारपूर येथील महिलेल्या घरी गेल्यानंतर त्रास सुरू झाला. महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांना महिला परदेशातून आली असल्याचं कळालं. त्यामुळे त्यांनी करोनाची तपासणी केली. त्यानंतर २२ मार्च रोजी आलेल्या रिर्पोटमध्ये महिलेला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील पिलभीतमध्ये घडला. महिलेला करोनाची लागण झाल्यानंतर हे सर्व परदेशातून प्रवास करून आल्याचं आणि होम क्वारंटाइनचा शिक्का मिटवल्याचा प्रकार समोर आला.
महिलेला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आरोग्य विभागानं कुटुंबातील सर्वांची तपासणी केली. यात तिच्या मुलालाही करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. हा मुलगाही आईसोबत मक्केला गेला होता. ‘आयएएनएस’ वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
याविषयी जिल्हा पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘३७ जणांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. इतर लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी तो पुसून टाकला. महिलेची तब्येत बिघडल्यानंतर ते सर्व करोना संशयित असल्याचं समोर आलं. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या पथकानं मक्केहून आलेल्या सगळ्या लोकांना पिलभीतमध्ये असलेल्या क्वारंटाइन कक्षात दाखल केलं आहे.’