देशात लॉकडाउन लागल्यामुळे हातावर पोट भरणारे अडचणी आले आहेत. मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउन झाला. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची सेवा पुरवणाऱ्यांनाच यातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे इतरांच्या रोजगारावर संकट आली आहे. ज्याचं पोट हातावर आहे, अशांच्या मदतीसाठी पारले जी कंपनीनं पुढाकार घेतला आहे.

देशभर २१ दिवसांच्या लॉकडाउनला सुरुवात झाली. या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे होत आहेत. सकाळी कमवायचं आणि रात्री खायचं अशी उपजिविका करणाऱ्यांनी आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. अशा गरीब लोकांसाठी मदतीचं आवाहनही करण्यात येत आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पारले-जी कंपनीनं मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी पुढच्या तीन आठवड्यात तब्बल 3 कोटी बिस्किट पाकिटांचं वाटप करणार आहे.

संचारबंदीच्या काळात दर आठवड्यात १ कोटी अशा प्रकारे तीन आठवड्यात 3 कोटी पाकिटांचं वाटप करणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सरकारच्या मदतीनं गरजू लोकांना याचं वाटप करण्यात येणार आहे.

सरकारनंही दिला मोठा दिलासा –

केंद्र सरकारनंही देशातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. ‘८० कोटी लोकांना २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलो दराने, तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ रुपये किलो दराने देणार,’ अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ‘त्याचबरोबर सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत,’ असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader