‘भय इथले संपत नाही’ अशाच परिस्थितीतून सध्या देश जात असल्याचं भयावह दृश्य आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला असून, देशात करोनानं रौद्रवतारच घेतला आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या संसर्ग आणि अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा, यामुळे देशात अनेक करोनाबाधितांचे उपचार मिळण्याआधीच तर काहीचे ऑक्सिजन वा इतर कारणांनी प्राण जात आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यूंची नोंद होत असून, मंगळवारी करोनाबळींची संख्या नव्या उच्चांकावर पोहोचली आहे.
विविध राज्यांनी लावलेला लॉकडाउन, गर्दी टाळण्यासाठी आणण्यात आलेले निर्बध. असं सगळं देशात सुरू असलं, तरी करोना संसर्गाचं थैमान अजूनही नियंत्रणात आलेलं नाही. देशात दररोज साडेतीन ते चार लाखांच्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांतील म्हणजे मंगळवारची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली असून, करोनावर मात करून परतलेल्या रुग्णांची संख्या वगळता चित्र फारसं आशादायक नसल्याचंच आकडेवारीतून दिसत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत तीन लाख ४८ हजार ४२१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत तीन लाख ५५ हजार ३३८ जणांनी करोनावर मात केली. चिंतेची बाब म्हणजे देशात एका दिवसात झालेल्या मृतांच्या संख्येनं नवा विक्रम नोंदवला आहे. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या आता २,५४,१९७ वर पोहोचली आहे.
India reports 3,48,421 new #COVID19 cases, 3,55,338 discharges and 4205 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,33,40,938
Total discharges: 1,93,82,642
Death toll: 2,54,197
Active cases: 37,04,099Total vaccination: 17,52,35,991 pic.twitter.com/fMKoTwf0kk
— ANI (@ANI) May 12, 2021
भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका
भारतात गेल्या ऑक्टोबर महिन्यात सापडलेला करोनाचा बी.१.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञ प्रमुख मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, बी.१.६१७ हा मूळ विषाणूपेक्षा वेगाने पसरणारा असून तो घातक असल्याची माहिती मिळाली आहे. या विषाणूचा मूळ प्रकार ऑक्टोबर २०२० मध्ये सापडला होता पण नंतर तोच विषाणू डिसेंबरमध्ये काही उत्परिवर्तनांसह सापडला होता. भारताली उत्परिवर्तनाचा हा विषाणू १९ देशांत पसरला असून अनेक देशांनी भारतात जाण्यास प्रवासबंदी लागू केली आहे.