देशात थैमान घालणाऱ्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची मगरमिठी आता सैल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासा देणारी आहे. १११ दिवसांनंतर म्हणजे जवळपास तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं आहे. देशातील रिकव्हरी रेट ९७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशात ३४ हजार ७०३ नवीन रुग्ण आढळून आले असून, ही मागील १११ दिवसांतील निचांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांबरोबरच सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या निचांकी रुग्णसंख्येबरोबरच देशातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्याही घटली आहे. देशात ४ लाख ६४ हजार ३५७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

तिसऱ्या लाटेची भीती… लसीकरणाला वेग

डेल्टा प्लस या विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, हा विषाणू तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत (५ जुलैपर्यंत) भारतात एकूण ३५,७१,०५,४६१ लशीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यात पहिल्या आणि दुसर्‍या डोसचा समावेश आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३१.४४ लाखांपेक्षा जास्त लशीचे डोस दिले गेले आहेत.

महाराष्ट्रातील परिस्थिती कशी?

महाराष्ट्रातील दररोजच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा जवळपास दुप्पट रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले. राज्यात सोमवारी (५ जुलै) ६ हजार ७४० नवीन करोनाबाधित आढळले, तर १३ हजार २७ रूग्ण करोनातून बरे झाले. राज्यात ५१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत (५ जुलै) एकूण ५८,६१,७२० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०२ टक्के झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

Story img Loader