जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे उपाय केले जात आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक असणाऱ्या इराणने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी चक्क ८५ हजार कैद्यांना मुक्त केलं आहे. देशातील कायदा आणि न्यायव्यवस्थेसंदर्भातील प्रवक्त्यांनीच ही माहिती दिली आहे.

गोल्हामुसेन इस्मायली यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैदी हे सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आले होते. तसेच या कैद्यांना मुक्त करण्यात आलं असलं तरी करोनाचा तुरुंगामध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात आहे.” मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये राजकीय कारणांसाठी तुरुंगात डांबण्यात आलेल्यांचा आकडाही मोठा आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार काद्यासंदर्भातील नियुक्त अधिकारी जावेद रेहमान यांनी राजकीय कारणांसाठी तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची सुटका करावी अशी मागणी सरकारकडे केली होती. रेहमान यांनी मागणी मान्य करण्यात आली आहे.

इराणमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या १४ हजार ९०० हून अधिक झाली आहे. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ८५३ इतकी आहे. याच पार्श्वभूमीवर मर्यादेपेक्षा अधिक कैदी असणाऱ्या तरुंगांमध्ये करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कैद्यांना तात्पुरत्या स्वरुपात मुक्त करण्यात आलं आहे.

Story img Loader