भारतातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. डॉक्टरने कर्नाटकमधील कलबुर्गी येथील करोना रुग्णावर उपचार केले होते. या रुग्णाचा नुकताच करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. १२ मार्च रोजी झालेल्या या मृत्यूमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. ही व्यक्ती सौदी अरेबियामधून भारतात परतली होती. यानंतर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उपचार करणाऱ्या डॉक्टरला करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कुटुंबासोबत त्यांच्या घरात बंदिस्त ठेवण्यात आलं आहे. त्यांना लवकरच विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार,” असल्याची माहिती कलबुर्गीचे उपायुक्त शरत बी यांनी दिली आहे. कर्नाटकमध्ये डॉक्टरसोबत अजून एक करोना रुग्ण सापडला असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत १० जणांना करोनाची लागण झाली आहे.

“करोनाचे अजून दोन रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या १० वर पोहोचली आहे. युकेवरुन आलेल्या २० वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती कर्नाटक सरकारकडून देण्यात आला आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी कर्नाटक सरकारने मॉल्स, चित्रपटगृहे, मैदानं, स्टेडिअम आणि पार्क बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus karnataka doctor tests positive sgy